नागपूरची निधी चांडक विदर्भात ‘टॉप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 10:41 PM2018-05-26T22:41:13+5:302018-05-26T22:42:49+5:30
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपराजधानीतील भवन्स बी.पी.विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स) या शाळेची विद्यार्थिनी निधी चांडक हिने अव्वल क्रमांक पटकाविला. निधी ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असून तिला ९८.६ टक्के गुण प्राप्त झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अव्वल स्थानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) वतीने मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचे निकाल शनिवारी जाहीर झाले. शाळांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार उपराजधानीतील भवन्स बी.पी.विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स) या शाळेची विद्यार्थिनी निधी चांडक हिने अव्वल क्रमांक पटकाविला. निधी ही वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असून तिला ९८.६ टक्के गुण प्राप्त झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अव्वल स्थानाची टक्केवारी वाढल्याचे दिसून आले.
सोमवारी ‘सीबीएसई’च्या संकेतस्थळावर दिल्ली, चेन्नई व त्रिवेंद्रम विभागाचा बारावीचा निकाल घोषित करण्यात आला. बारावीच्या निकालात यंदाही विद्यार्थिनींनीच आपली जादू कायम ठेवली. ‘सीबीएसई’ने कुठलीही गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. मात्र शाळांनी दिलेल्या माहितीनुसार, टॉप २० मध्ये आलेल्यांमध्ये सर्वात जास्त संख्या ही विद्यार्थिनींचीच आहे. विज्ञान, वाणिज्य शाखेत मुलींचाच वरचष्मा दिसून आला. शिवाय ‘सेलिब्रेशन’मध्येदेखील विद्यार्थिनींचाच जास्त उत्साह दिसून येत होता.
नागपूर जिल्ह्यातून १,६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या परीक्षेत बहुतांश शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत. विज्ञान शाखेत सेंटर पॉईन्ट स्कूलची विद्यार्थिनी अमिषा केळकर हिने ९७.८ टक्के गुणांसह अव्वल क्रमांक पटकाविला. तर मानव्यशास्त्र शाखेत भवन्स बी.पी.विद्यामंदिर (सिव्हिल लाईन्स) येथील नैतिक मुळे हा विद्यार्थी ९५.६ टक्के गुणांसह प्रथम स्थानावर आला.