वाशिमचा नीलकृष्णा गजरे जेईई मेन्समध्ये देशात पहिला
By निशांत वानखेडे | Published: April 25, 2024 06:15 PM2024-04-25T18:15:12+5:302024-04-25T18:17:09+5:30
माे. सुफियानला १६ वी रँक : ५० टक्क्याच्यावर विद्यार्थी ठरले ॲडव्हान्ससाठी पात्र
नागपूर : नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे घेण्यात येणारी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षा जेईई मेन्समध्ये नागपुरात शिक्षण घेत असलेला नीलकृष्णा निर्मलकुमार गजरे हा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. मूळचा वाशिम जिल्ह्यातील नीलकृष्णाने परीक्षेत १०० टक्के पर्सेंटाईल प्राप्त करीत टाॅप करून नागपूर व वाशिमचे नाव राष्ट्रीय स्तरावर पाेहोचविले आहे.
नीलकृष्णा हा बेलखेड, ता. मंगरूळपीर या छाेट्याशा खेड्यातील शेतकरी निर्मलकुमार गजरे यांचा मुलगा आहे. दहावीपर्यंत कारंजा येथे शिकलेला नीलकृष्णाने त्यानंतर शेगावच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला. आयआयटी मुंबईचे ध्येय ठरविलेल्या नीलकृष्णाने पुढच्या तयारीसाठी नागपूर गाठले व एका खासगी शिकवणी वर्गातून अभ्यास केला. नीलने जेईईच्या पहिल्या सत्राच्या परीक्षेतही गुणवत्तापूर्ण यश प्राप्त केले हाेते. त्याचे यश नागपूरच नाही तर खेडेगावातील मुलांसाठी प्रेरणादायी ठरले आहे.
नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जेईई मेन्सच्या दुसऱ्या सत्राची परीक्षा ४, ५, ६, ८ व ९ एप्रिल राेजी घेण्यात आली हाेती. बुधवार, दि. २४ एप्रिल राेजी रात्री १२ वाजताच्या दरम्यान परीक्षेचा निकाल लागला. त्यामुळे गुरुवारी सकाळपासून निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता लागली हाेती. दिवसभर ही धडपड चालली. निकालात नागपूरच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शहरातील ४ विद्यार्थ्यांनी पहिल्या १०० मध्ये स्थान प्राप्त केले. यात मूळचा दर्यापूर येथील रहिवासी व पाच वर्षांपासून नागपुरात शिक्षण घेत असलेला माेहम्मद सुफियान या विद्यार्थ्याने १६ वी रँक प्राप्त केली. यासह देवांश गट्टानी या विद्यार्थ्याने ९९.९९ टक्के पर्सेंटाईल प्राप्त करीत ऑल इंडिया ८२ वी रँक, तर अक्षत खंडेलवाल या विद्यार्थ्याने ९० वी रँक प्राप्त केली आहे.
नागपुरातील जवळपास १५०० विद्यार्थ्यांनी जेईई मेन्सची परीक्षा दिली हाेती. त्यातील ५० ते ६० टक्के विद्यार्थी जेईई ॲडव्हान्ससाठी पात्र ठरल्याचे सांगण्यात येते. यातील १२ च्यावर विद्यार्थ्यांनी १,००० मध्ये, तर ३८च्यावर विद्यार्थ्यांनी पहिल्या ५,००० विद्यार्थ्यांमध्ये स्थान प्राप्त केल्याची माहिती आहे.
आता तयारी ॲडव्हान्सची
मेन्स परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थी आता जेईई ॲडव्हान्स परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. येत्या दि. २६ मे राेजी ॲडव्हान्स परीक्षा हाेणार आहे. नागपुरातून जवळपास ६० टक्के म्हणजे ७०० च्यावर विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.
ध्येय गाठण्याचा विश्वास हाेता : नीलकृष्णा
एका छाेट्याशा खेड्यात राहणारा नीलकृष्णा अभ्यासाबाबत अतिशय दृढ निश्चयी आहे. त्याने आयआयटी मुंबई गाठण्याचे ध्येय ठरविले हाेते व त्यानुसार अतिशय काटेकाेर अभ्यास चालविला हाेता. वडिलांच्या शेतीची अनिश्चितता त्याला ठाऊक आहे. त्यामुळे आपल्या गुणवत्तेने स्काॅलरशिपच्या भरवशावर काेचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेतला. पहाटे उठून अभ्यास, त्यानंतर पाच तास क्लासेस आणि त्यानंतर पुन्हा ५ ते ६ तास अभ्यास असे वेळापत्रक त्याने निश्चित केले हाेते. या काळात साेशल मीडिया किंवा माेबाइलपासून ताे दूरच राहिला. ॲडव्हान्समध्येही सर्वाेत्तम स्काेअर करून ध्येय मिळविण्याचा विश्वास त्याने ‘लाेकमत’शी बाेलताना व्यक्त केला.