अयोध्येत रामललाच्या चरणी निनादणार नागपुरातील ‘रामधुन’, १११ वादक करणार अनोखी रामसेवा
By योगेश पांडे | Published: January 8, 2024 09:28 PM2024-01-08T21:28:16+5:302024-01-08T21:29:34+5:30
श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून शहरातील शिवगर्जना ढोल पथकाकडून निमंत्रण आले असून दोन दिवस त्यांचा सादरीकरण राहणार आहे.
नागपूर : अयोध्येतील राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरू असताना नागपुरकरांचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देश राममय होणार असताना अयोध्येतील रामललाच्या चरणी नागपुरातील ढोल-ताशा-ध्वज पथकातील ‘रामधुन’ निनादणार आहे. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाकडून शहरातील शिवगर्जना ढोल पथकाकडून निमंत्रण आले असून दोन दिवस त्यांचा सादरीकरण राहणार आहे.
नागपुरात मागील काही वर्षांपासून ढोल-ताशा पथकांच्या वादनाची परंपरा सुरू झाली आहे. शहरातील अनेक तरुण-तरुणी याच्याशी जुळले आहेत. २२ जानेवारीसाठी गल्ली ते दिल्ली तयारी सुरू असताना अयोध्येतूनदेखील नागपुरातील ढोलपथकाची नोंद घेण्यात आली व प्रत्यक्ष मंदिर परिसरात सादरीकरणाची संधी देण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर २४ व २५ जानेवारी रोजी शिवगर्जना ढोल पथकातर्फे मंदिर तसेच हनुमानगढी येथे सादरीकरण करण्यात येणार आहे. पथकाकडून पारंपारिक धून तर सादर करण्यात येतीलच. मात्र अयोध्येत खास रामधुन व बजरंगबली धुन सादर करण्यावर त्यांचा भर राहणार आहे.
पोद्दारेश्वर राममंदिरातून सुरू होणार प्रवास
शिवगर्जना पथकाचे प्रमुख प्रतिक टेटे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शिवगर्जना ढोल-ताशा-ध्वज पथक अयोध्येत वादन करणार आहेत. आमचे पथक ४०-५० ढोल, २०-५ ताशे, २१ ध्वज व १० झांज घेऊन रामचरणी पोहोचले. आमच्या पथकात १११ वादक तरुण-तरुणी आहेत. आम्ही बसने अयोध्येत पोहोचू. आमचा प्रवास आम्ही शहरातील पोद्दारेश्वर राममंदिरात पूजा करून सुरू करू. संपूर्ण जगाच्या नजरा अयोध्येकडे लागल्या आहेत. आम्हाला रामलल्लानेच बोलविले असून आम्ही भाग्यवानच आहोत, अशी भावना टेटे यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्राच्या परंपरेचे रामनगरीत सादरीकरण
या पथकाशी शहरातील शेकडो तरुण-तरुणी जुळले आहेत. आपापली कामे, अभ्यास इत्यादी बाबी सांभाळून नियमितपणे ते सराव करतात. शहर व देशाच्या विविध भागातील अनेक कार्यक्रमांत त्यांनी सादरीकरण केले आहे. या संधीच्या निमित्ताने अयोध्येत महाराष्ट्राच्या परंपरेचे वादन निनादणार आहे.