नागपूरकरांची ‘सावली’ झाली गायब
By admin | Published: May 27, 2016 02:33 AM2016-05-27T02:33:37+5:302016-05-27T02:33:37+5:30
उन्हाळ्यात तापणाऱ्या नागपुरात दुपारच्या सुमारास अनेकदा शुकशुकाट असतो. नागरिकांच्या सोबत असते ती त्यांची सावली.
सूर्य आला डोक्यावर : ‘शून्य सावली’चा अनुभव
नागपूर : उन्हाळ्यात तापणाऱ्या नागपुरात दुपारच्या सुमारास अनेकदा शुकशुकाट असतो. नागरिकांच्या सोबत असते ती त्यांची सावली. परंतु गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास चक्क सावलीनेदेखील नागपूरकरांची साथ सोडली. सूर्याच्या विशिष्ट स्थितीमुळे नागरिकांनी ‘शून्य सावली’चा अनुभव घेतला. या अनोख्या घटनेला नागपूरकरांनी मोठ्या प्रमाणावर मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केले.
भरदुपारी सूर्याच्या विशिष्ट स्थितीमुळे सावली बरोबर पायाखाली आल्यामुळे दुपारी १२ वाजून १० मिनिटांनी ‘शून्य सावली’चा अनुभव अनेक नागपूरकरांनी घेतला. सुमारे अर्धा ते एक मिनीट ही स्थिती होती. पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडेच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. पण, या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवण्यास मिळतो. सूर्य बरोबर डोक्यावर आल्यावर आपली सावली अदृश्य झाल्यासारखी वाटते. प्रत्यक्षात ती बरोबर पायांखाली पडत असते. ‘शून्य सावली’च्या निमित्ताने रमण विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (प्रतिनिधी)