नागपूरचे शायर जमाल यांनी तोडला शेरोशायरीचा विश्वविक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 01:25 AM2018-12-02T01:25:48+5:302018-12-02T01:28:30+5:30
नगरसेवक व शायर मोहम्मद जमाल यांनी सतत १२८ तास शेरोशायरी करीत अखेर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नाव नोंदविले. शनिवारी रात्री ७.४५ वाजता जमाल यांनी विक्रम करताच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. आयोजक मनीष पाटील व उत्साही मित्रांनी फुलांची माळ घालून हा आनंद साजरा केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नगरसेवक व शायर मोहम्मद जमाल यांनी सतत १२८ तास शेरोशायरी करीत अखेर गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकार्डमध्ये नाव नोंदविले. शनिवारी रात्री ७.४५ वाजता जमाल यांनी विक्रम करताच त्यांच्यासाठी प्रार्थना करणाऱ्यांच्या आनंदाला उधाण आले. आयोजक मनीष पाटील व उत्साही मित्रांनी फुलांची माळ घालून हा आनंद साजरा केला.
संविधान जनजागृतीच्या उद्देशाने रेकार्ड बनविण्याचे ध्येय ठेवत मो. जमाल यांनी २६ नोव्हेंबर संविधान दिनी सकाळी ११ वाजतापासून शेरोशायरीला सुरुवात केली. शुक्रवारी पाचव्या दिवशी जमाल यांची प्रकृती बिघडत चालली होती. गळ्यात इन्फेक्शनमुळे आवाज बसला होता. यामुळे आयोजकांचीही चिंता वाढली होती. कुटुंबीय व स्थानिक नागरिकांनी त्यांच्यासाठी प्रार्थना सुरू केली. जमाल यांचे वजन ४ किलोने घटले होते. शायरी गाण्यास त्रास होत असल्याने आयोजकांनी १०० तासांचा विक्रम करून समोरचा धोका न पत्करण्याचा सल्ला त्यांना दिला. यादरम्यान डॉक्टरांच्या उपस्थितीतच त्यांना उलट्याही झाल्या. यानंतर मात्र थोडे हलके वाटत असल्याचे जमाल यांनी सांगितले आणि पूर्ण १२८ तासांचा विक्रम करण्याचा विश्वास व्यक्त केला व पुन्हा शायरीला सुरुवात केली. अखेर शनिवारी रात्री त्यांनी या विक्रमाची नोंद केली.
यापूर्वी झाले हे विक्रम
यापूर्वी उत्तर नागपुरातून गिनीज बुकमध्ये सर्वाधिक वेळ बुद्ध-भीम गीत गायन, एकल फिल्मी गीत गायन व सामूहिक गीत गायनाचा विक्रम नोंदविला गेला आहे. शायर जमाल यांचा हा चौथा विक्रम ठरला आहे.