काय सांगता... चक्क २० कात्र्यांनी कापले केस, केशकर्तनाचा नागपुरात अनोखा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2021 01:17 PM2021-12-20T13:17:47+5:302021-12-20T13:50:59+5:30
एकाच वेळी ११ कात्र्या वापरून केशकर्तन करण्याचा २०१८ मधील स्वत:चा गिनीज बुकातील विक्रम मोडीत काढून शिवा खापरकर या तरुणाने नागपुरात शनिवारी २० कात्र्यांनी केशकर्तन करण्याचा नवा विक्रम प्रस्थापित केला.
नागपूर : नागपुरचा शिवा खापरकर या तरुणाने आपल्या नावावर एक अनोखा विक्रम प्रस्थापित केलाय. त्याने एक-दोन नव्हे तर चक्क २० कात्र्या दोन्ही हातात धरून हेअर कटींग केलीय. नाभिक एकता मंच अंतर्गत महाराष्ट्र नाभिक एकता मंच सलून पार्लर असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांनी या नव्या विक्रमाची नोंद केली.
शिवाच्या या अनोख्या विक्रमाने भल्या-भल्यांना आश्चर्यात टाकलयं. विशेष म्हणजे, याआधी त्याने ११ कात्र्या एकत्रिक धरून केस कापण्याचा विक्रम केला होता. तर, आता त्याने स्वत:चा जुना विक्रम मोडून काढत २० नवीन विक्रम आपल्या नावे केलाय. इतकेच नव्हे तर, त्याच्या नावावर २० तासात ४०७ हेअर कटींगचा लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉडचीदेखील नोंद आहे.
मुळ अकोला जिल्ह्यातील छोट्याशा गावातून आलेल्या शिवाच्या या कौशल्याने अनेकांनी लय भारी अंदाज म्हणत त्याचे कौतुक केले आहे. नागपुरातील नगाजी महाराज सांस्कृतिक सभागृहात शनिवारी त्यांनी हे अफलातून कौशल्य दाखवलं. त्यांचा २० कात्रीने केस कापण्याचा व्हिडिओ हा विश्वविक्रम नोंदवणाऱ्या संस्थेला पाठवण्यात आला असून लवकरच अधिकृतपणे याची नोंद होईल.
नाभिक समाजातील युवक युवतीसाठी हेअरकट व हेअरआर्ट एकदिवसीय नि:शुल्क कार्यशाळा शिवा खापरकर याच्या मार्गदर्शनाखाली झाली. प्रशिक्षणाच्या निमित्ताने त्यांनी स्वत:चा नवा विक्रम रचला. विदर्भभरातून आलेल्या युवकांनी यावेळी प्रशिक्षण घेतले.