सौदा झालेली नागपूरची चिमुकली पोहचली मातेच्या कुशीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:57 PM2017-12-07T23:57:30+5:302017-12-08T00:04:11+5:30
पैशाचे आमिष दाखवून जन्मताच गरीब मातेपासून दूर करण्यात आलेली चिमुकली तब्बल १३ दिवसांनंतर तिच्या मातेच्या कुशीत पोहचली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : पैशाचे आमिष दाखवून जन्मताच गरीब मातेपासून दूर करण्यात आलेली चिमुकली तब्बल १३ दिवसांनंतर तिच्या मातेच्या कुशीत पोहचली. दरम्यान, ज्या दाम्पत्याने ही चिमुकली सरोगसीच्या नावाखाली दत्तक घेतली होती त्या दाम्पत्याच्याही भावनांचा मुंधडा दाम्पत्याने पैशासाठी डाव मांडला होता, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या प्रकरणात आता अनेक धक्कादायक खुलासे होण्याचेही संकेत मिळाले आहेत.
मोना आणि अविनाश बारसागडे नामक मजूर दाम्पत्य अमरावती मार्गावर राहते. त्यांना पाच वर्षांचा मुलगा आहे. प्रेमविवाह केल्यामुळे ते दोन्ही कुटुंबीयांकडून दुरावले आहेत. दुसºयांदा गर्भवती झालेल्या मोनाची आठ महिन्यांपूर्वी एका खासगी रुग्णालयात भारती नावाच्या महिलेसोबत भेट झाली होती. गरीब आणि निराधार गर्भवती महिलांना हेरून त्यांच्याशी सलगी वाढविणाऱ्या आणि नंतर त्यांच्या नवजात बाळाची खरेदी-विक्री करणाऱ्या रॅकेटची भारती सदस्य आहे. तिने मोनाला प्रसूतीत मदत करण्याची बतावणी करून मोनाशी संपर्क वाढवला. ती सलग तिच्याशी मोबाईवर संपर्क साधू लागली. मोनाची आर्थिक अवस्था गरीब असल्यामुळे तू तुझ्या जन्माला येणाऱ्या बाळाची चांगली देखभाल करू शकणार नाही, असे मोनाच्या मनावर बिंबवण्यात भारती यशस्वी झाली. त्यासाठी भारतीने मोनाला प्रसूतीनंतर तिचे बाळ दिल्यास मोठी रक्कम देण्याचे आमिष दाखविले. मोना द्विधा मनस्थितीत सापडल्यानंतर भारतीने तिची आरोपी मनीष सूरजरतन मुंधडा (३६), त्याची पत्नी हर्षा मुंधडा (३२) रा. सेनापतीनगर, दिघोरी यांच्याशी भेट घालवून दिली. त्यांनी मोनावर जाळे टाकत तिची आपल्या देखरेखीखाली सोनोग्राफी करवून घेतली अन् अवधी पूर्ण होण्यापूर्वीच तिचे बाळंतपण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोनाने नकार देऊन मेडिकलमध्ये भरती होणे पसंत केले.
२० नोव्हेंबरला ती मेडिकलमध्ये दाखल झाली अन् तिने २२ नोव्हेंबरला गोंडस मुलीला जन्म दिला. बाळंतपण नॉर्मल झाले अन् बाळ तसेच मातेची प्रकृती ठीक असल्यामुळे तिला लवकरच सुटीदेखील मिळाली. त्यानंतर आरोपी भारती आणि मुंधडा दाम्पत्याने मोना तसेच तिच्या पतीला पैशाचे आमिष दाखवत, तिच्यावर दबाव आणत ३ डिसेंबरला तिला धंतोलीत बोलविले आणि अखेर मोनाची चिमुकली तिच्यापासून विकत घेण्याच्या नावाखाली हिरावून घेतली.
जन्मापूर्वीच झाला सौदा
मोनाची मुलगी २२ नोव्हेंबरला जन्माला आली असली तरी तिच्या जन्मापूर्वीच आरोपी मुंधडा दाम्पत्याने भारतीच्या मदतीने तिला तिच्या आईच्या कुशीपासून दूर करण्याचा घाट घातला होता. जन्माआधीच मोनाच्या मुलीचा सौदा केला होता. मोनाला त्याबदल्यात काही हजार रुपये देणाऱ्या आरोपींनी तिच्या मुलीला सोनेगावच्या एका संपन्न दाम्पत्याला सव्वादोन लाखात विकत देण्याचे ठरवले होते. चिमुकली ताब्यात येताच तिला सोनेगावच्या सुशिक्षित दाम्पत्याला सोपविण्यात आले. १८ वर्षांपासून अपत्य सुखासाठी आसुसलेल्या या दाम्पत्याने चिमुकलीला विकत घेतले अन् तिला घरी नेऊन तिचे कोडकौतुक करू लागले.
स्वप्नांचा चुराडा
या प्रकरणाचा वृत्तपत्रातून बोभाटा झाल्यामुळे सोनेगावच्या दाम्पत्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. त्यांनी धंतोली पोलिसांशी संपर्क साधला. आपण सरोगसी मदरच्या माध्यमातून रीतसर मुलीला दत्तक घेतल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, हे प्रकरण सरोगसीचे नव्हे तर मुलीच्या खरेदी-विक्रीचे असून, त्याचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती धंतोलीचे द्वितीय पोलीस निरीक्षक शेंडे यांनी सदर दाम्पत्याला दिले. त्यामुळे त्यांनी आपल्या काळजावर दगड ठेवून चिमुकलीला पोलिसांच्या माध्यमातून मोनाला सोपविले.
दोन्हीकडे गहिवर
पोलिसांनी चिमुकलीची वैद्यकीय तपासणी करून घेतल्यानंतर गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास मोनाला तिच्या काळजाचा तुकडा सोपविला. तब्बल १३ दिवसानंतर चिमुकली परत मिळाल्याने मोना आणि तिच्या पतीच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. दुसरीकडे अपत्य सुख मिळाल्यानंतर लगेच त्या सुखापासून वंचित व्हावे लागल्याने सोनेगावच्या दाम्पत्यांनाही दाटून आले. त्यांच्याही डोळ्यात अश्रू होते. मात्र, ते अपत्य विरहाचे होते. दरम्यान, या प्रकरणात आणखी अनेक धक्कादायक पैलू उघड होण्याची शक्यता असून, आरोपींनी आणखी अशाच प्रकारे किती जणांच्या भावनांची खरेदी-विक्री केली, त्याची पोलीस चौकशी करीत आहेत. फरार आरोपी भारतीचाही शोध घेतला जात आहे.