नागपुरातील ठगबाज पिंपळेने हडपले १० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 08:30 PM2020-06-16T20:30:05+5:302020-06-16T20:32:16+5:30

केमिकल फॅक्टरीचे लायसन्स मिळवून देण्याची थाप मारून एका कथित नेत्याने एका दाम्पत्याचे १० लाख रुपये हडपले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. उमेश मारोतराव पिंपळे असे आरोपीचे नाव असून तो गोकुळपेठ मार्केट जवळ राहतो.

Nagpur's swindler Pimple snatched Rs 10 lakh | नागपुरातील ठगबाज पिंपळेने हडपले १० लाख

नागपुरातील ठगबाज पिंपळेने हडपले १० लाख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केमिकल फॅक्टरीचे लायसन्स मिळवून देण्याची थाप मारून एका कथित नेत्याने एका दाम्पत्याचे १० लाख रुपये हडपले. प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. उमेश मारोतराव पिंपळे असे आरोपीचे नाव असून तो गोकुळपेठ मार्केट जवळ राहतो. फिर्यादी लीना दिगंबर नारनवरे ( वय ४२) या खामल्यातील मिलिंद नगरात राहतात. त्या आणि त्यांचे पती दिगंबर लक्ष्मणराव नारनवरे यांच्यासोबत आरोपी उमेश पिंपळेची जुनी ओळख आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, नारनवरे दाम्पत्य स्वच्छतेसाठी घरगुती वापरात येणारे फिनाईलसारखे केमिकल बनवितात. आरोपी पिंपळे याने नारनवरे दाम्पत्याला विश्वासात घेतले आणि त्यांना केमिकल्स बनविण्याचा परवाना मिळवून देण्याची बतावणी केली. त्यासाठी थोडासा खर्च करावा लागेल, असे सांगून आरोपीने नारनवरे दाम्पत्याला जाळ्यात ओढल्यानंतर १ जानेवारीपासून ३० जून २०१९ पर्यंत वेगवेगळ्या वेळी एकूण १० लाख रुपये त्यांच्याकडून घेतले. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्यक्तीचे नाव सांगून त्यांना पैसे द्यावे लागतात, असे आरोपी पिंपळे म्हणायचा.

घर गहाण ठेवून दिले पैसे
केमिकल बनविण्याचे लायसन्स मिळाल्यास आपली आर्थिक प्रगती होईल, या आशेपोटी नारनवरे दाम्पत्याने प्रारंभी कर्ज काढले. नंतर स्वत:चे घर गहाण ठेवून आरोपीला रक्कम दिली. मात्र एवढी मोठी रक्कम घेऊनही आरोपींनी त्यांना कसल्याही प्रकारचे लायसन्स बनवून दिले नाही. या, त्या कार्यालयात नेऊन आरोपी पिंपळे नारनवरे दाम्पत्यांना त्यांच्या कामासाठी धावपळ करीत असल्याचा बनाव करीत होता. त्याची बनवेगिरी लक्षात आल्यानंतर नारनवरे यांनी त्याला आपली रक्कम परत मागितली. त्यानंतर पिंपळेने प्रतिसाद देणे बंद केले.

धनादेशही वटले नाही
पिंपळे आपले काम करून देणार नाही, हे लक्षात आल्यामुळे नारनवरे दाम्पत्याने आपली रक्कम मागण्यासाठी त्याच्या मागे तगादा लावला. पिंपळेने नारनवरे दाम्पत्याला ६.५० लाख रुपयाचे वेगवेगळे धनादेश दिले. मात्र त्यातील एकही धनादेश वटला नाही. तो रक्कम देणार नाही, त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे नारनवरे दाम्पत्यांनी प्रतापनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. त्यानंतर सोमवारी पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांची भेट घेतली. तक्रार आणि पुरावे तपासल्यानंतर उपायुक्त मासाळ यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरून प्रतापनगर पोलिसांनी आरोपी उमेश पिंपळेविरुद्ध भादवि कलम ४२०,४०६ अन्वये गुन्हा नोंदविला. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक झाली नव्हती.

अनेकांना गंडा
पिंपळे यांनी अशाच प्रकारे अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची माहिती आहे. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही प्रतापनगर ठाण्यात तक्रारी दाखल झाल्याचे सांगितले जाते. त्याची स्वत:ची केरोसीनची एजन्सी असल्याचे पोलीस सांगतात. अशाच प्रकारची एजन्सी मिळवून देतो, असे सांगून तो सावज जाळ्यात ओढतो आणि त्यांची लाखोने फसवणूक करतो, अशी चर्चा आहे.

Web Title: Nagpur's swindler Pimple snatched Rs 10 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.