नागपूरचे तापमान ४.२ अंशाने घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 07:00 AM2021-05-17T07:00:00+5:302021-05-17T07:00:07+5:30
Nagpur News गेल्या काही दिवसापासून नागपूरसह विदर्भात सुरू असलेला उनसावल्यांचा खेळ रविवारीही चालला. बदलत्या वातावरणामुळे तापमानात माेठी घट झाली असून नागपूर शहराचे तापमान २४ तासात ४.२ अंशाने घसरून ३९ अंश सेल्सिअस नाेंदविण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही दिवसापासून नागपूरसह विदर्भात सुरू असलेला उनसावल्यांचा खेळ रविवारीही चालला. बदलत्या वातावरणामुळे तापमानात माेठी घट झाली असून नागपूर शहराचे तापमान २४ तासात ४.२ अंशाने घसरून ३९ अंश सेल्सिअस नाेंदविण्यात आले. सर्वाधिक ४२.७ अंश तापमान ब्रम्हपुरीचे नाेंदविण्यात आले.
मुंबईसह पूर्वेच्या समुद्र किनारपट्टीवर निर्माण झालेल्या ताउते चक्रीवादळाचा परिणाम देशातील विविध प्रदेशात दिसून येत आहे. थाेड्याअधिक फरकाने वातावरण बदलले असून अनेक भागात जाेरदार पाऊस नाेंदविण्यात आला असून पुढचे दाेन दिवस असेच वातावरण राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तापमानात घट नाेंदविण्यात आली. सकाळी उन आणि दुपारपासून आकाशात ढगांचे आच्छादन दिसून आले. विदर्भातील काही भागात पुढचे दाेन दिवस १८ मे पर्यंत विजांचा कडकडाट, वेगाने वाहणाऱ्या वादळासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रविवारीही नागपूर जिल्ह्याच्या काही भागात वादळवाऱ्यासह हलका पाऊसही झाल्याची माहिती आहे. भंडारा जिल्ह्यातही वातावरण वादळग्रस्त झाल्याची माहिती आहे. पुढचे दाेन दिवस वातावरण असेच राहणार असून त्यानंतर तापमानात पूर्ववत वाढ हाेण्याचा अंदाज विभागाने नाेंदविला.
दरम्यान गेल्या २४ तासात विदर्भातील बहुतेक जिल्ह्यात तापमानात घसरण झाली आहे. नागपूरनंतर अमरावतीत ३.७ अंशाच्या घसरणीसह ३८.६ अंश तापमान नाेंदविले गेले. वर्धा ४ अंशाची घट झाली व ३८.८ अंश तापमान नाेंदविले गेले. चंद्रपूर ३.४ अंश घट व ३९.४ अंश तापमान, अकाेला २.४ अंश घट व ४०.१ अंश तापमान, तसेच बुलडाणा १.२, गाेंदिया २.४, यवतमाळ २.२ अंशाची घट नाेंदविण्यात आली. पुढचे दाेन दिवस २ ते ४ अंशाची घसरण तापमानात हाेणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने नाेंदविला.