नागपूर शहरातील टॉयलेटस्ला मिळणार ‘स्मार्ट लूक’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 01:00 PM2019-05-20T13:00:44+5:302019-05-20T13:02:20+5:30
नागपूर महापालिका सार्वजनिक मुतारीला लवकरच स्मार्ट लूक देणार आहे. यासाठी आकर्षक मॉडेल निश्चित करून यापुढे नवीन मुतारीचे बांधकाम त्यानुसार केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील सार्वजनिक मुतारी नियमित स्वच्छ राहत नाही. बांधकाम व्यवस्थित नाही. दुर्गंधीमुळे नागरिक त्याचा उपयोग करणे टाळतात. नागरिक उघड्यावर किंवा आडमार्गाला लघुशंका करतात. स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असताना शहरासाठी हे भूषणावह नाही. याचा विचार करता महापालिका सार्वजनिक मुतारीला लवकरच स्मार्ट लूक देणार आहे. यासाठी आकर्षक मॉडेल निश्चित करून यापुढे नवीन मुतारीचे बांधकाम त्यानुसार केले जाणार आहे.
नागपूर शहरात सार्वजनिक ९५ मुतारी आहेत. बाजार व वर्दळीच्या भागात मुतारींची संख्या पुरेशी नाही. शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने आरोग्य विभागाने नवीन ३० मुतारींच्या बांधकामाचा प्रस्ताव महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे पाठविला आहे. यासाठी शहराच्या विविध भागात जागा निश्चित केलेल्या आहेत. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर त्याची झोनस्तरावरून अंमलबजावणी केली जाईल. महापालिके च्या २०१९-२० या वर्षाच्या अर्थसंकल्पात मुतारी बांधकामासाठी आर्थिक तरतूद केली जाणार आहे. शहरात सार्वजनिक ९५ मुतारी आहेत. यातील अनेक मुतारींचे बांधकाम जीर्ण झाले आहे. अशा मुतारींचे बांधकाम नवीन मॉडेलनुसार केले जाणार आहे.
गडकरींच्या संकल्पनेमुळे मुतारी दुर्गंधीमुक्त
केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानाचा लाभ सर्व स्तरातील नागरिक ांना व्हावा, यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी पुढाकार घेतला. ‘स्वच्छालय अपनाओ, स्वच्छ भारत बनाओ’ अशी संकल्पना त्यांनी मांडली आहे. ती प्रत्यक्षात अमलात आणली आहे. शहरातील सर्व मुतारी दुर्गंधीमुक्त करण्यासाठी देशात प्रथमच आॅर्गेनिक (सेंद्रिय) पावडरचा वापर करण्यात आला. नोव्हेंबर २०१८ मध्ये नागपुरात या अभिनव अभियानाची सुरुवात केली होती. आज शहरातील मुतारी दुर्गंधीमुक्त झालेल्या आहेत
प्रस्ताव सादर केला
शहरातील सर्व मुतारींचे बांधकाम सारखे व आकर्षक असावे, यासाठी बांधकामाचे एक मॉडेल निश्चित करावे, नवीन बांधकाम करताना वा जीर्ण मुतारी नव्याने बांधताना त्याची अंमलबजावणी केली जावी, अशा स्वरूपाचा प्रस्ताव आरोग्य विभागाने दिला आहे. यात शहरातील ३० मुतारींचा समावेश आहे.
- डॉ. प्रदीप दासरवार, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छ भारत मिशन)
नवीन पद्धतीने
बांधकाम करू
मुतारी बांधकामाची जबाबदारी झोन कार्यालयांकडे सोपविली आहे. नवीन मुतारींचे बांधकाम आरोग्य विभागाच्या प्रस्तावानुसार केले जाईल. तसेच जीर्ण वा मोडकळीस आलेल्या मुतारींचे बांधकाम त्या स्वरूपाचे केले जाईल. यामुळे मुतारीला आकर्षक लूक प्राप्त होईल.
- मनोज तालेवार, अधीक्षक अभियंता लोककर्म महापालिका