नागपुरात वाहतूक कोंडीने घेतली बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 09:51 AM2018-02-22T09:51:56+5:302018-02-22T09:54:05+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

Nagpur's Traffic Due to the Pre-Examination of HSC students! | नागपुरात वाहतूक कोंडीने घेतली बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा !

नागपुरात वाहतूक कोंडीने घेतली बारावीच्या विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा !

googlenewsNext
ठळक मुद्दे परीक्षेच्या पहिल्या दिवशीच फुटला घाम

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे आयोजित बारावीच्या परीक्षेला बुधवारपासून सुरुवात झाली. उपराजधानीत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा फटका विद्यार्थ्यांना बसला व अनेकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. शिवाय सकाळी बसेसदेखील बंद असल्यामुळे परीक्षा केंद्रावर जाण्याअगोदरच अनेकांची दुहेरी परीक्षाच झाली. दरम्यान, विभागामध्ये काही तुरळक प्रकार वगळता परीक्षेचा पहिला दिवस शांततेतच पार पडला. नागपूर विभागातून या वर्षी सहा जिल्ह्यांतून एकूण १ लाख ७२ हजार ४११ परीक्षार्थ्यांनी यंदा परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विभागातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर जिल्ह्यांतील एकूण ४५२ केंद्रांवर परीक्षा होत आहे. उपराजधानीत सुरू असलेल्या विकासकामांमुळे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता अनेक विद्यार्थी पालकांसोबत तासभर अगोदरपासूनच परीक्षा केंद्रावर पोहोचले होते. तर आपली बसचा संप असल्याचे वृत्त सकाळीच वाचल्यामुळे अनेक जण मिळेल त्या साधनांनी परीक्षा केंद्रावर पोहोचले. त्यामुळे आॅटोचालकांना मनमानी शुल्क देऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्र गाठले. तर अनेकांना रस्त्यावरील व्यक्तींनी काही दूरपर्यंत सोडून दिल्याचेही केंद्रावरील विद्यार्थ्यांनी सांगितले. 

परीक्षा केंद्रांसमोर कोंडी
दरम्यान १० वाजतापासूनच परीक्षा केंद्रांजवळील रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी दिसून येत होती. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना नियोजित वेळेपेक्षा केंद्रावर पोहचण्यात उशीर झाला. काही बेशिस्त पालकांनी परीक्षा केंद्रांसमोर अस्ताव्यस्तपणे चारचाकी वाहने लावली. मंडळातर्फे दुचाकी वाहनांनी येण्याचे आवाहन करण्यात आले होते हे विशेष. शिवाजी विज्ञान महाविद्यालयासमोर तर बराच वेळ वाहतुकीची कोंडी होती.

विभागात ‘कॉपीमुक्त’ मोहिमेचा प्रभाव
परीक्षेत गैरप्रकार होऊ नयेत यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांनी पहिल्याच दिवशी संपूर्ण विभागात १० कॉपीबहाद्दरांना पकडले. यात गोंदिया (१), भंडारा (१), गडचिरोली (४) व चंद्रपूर (४) या जिल्ह्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात एकही कॉपीबहाद्दर सापडला नाही. मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘कॉपीमुक्त’ मोहिमेचा हा प्रभाव असल्याचे मत व्यक्त करण्यात येत होते.

विद्यार्थ्यांसाठी सुरुवात ‘झक्कास’
घरातून परीक्षा केंद्राकडे निघताना हृदयाची स्पंदने वाढलेली होती, परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर सातत्याने घसा कोरडा पडत होता, वेळेवर केलेला अभ्यास आठवेल की नाही ही भीती होती. परंतु हातात प्रश्नपत्रिका आली आणि ‘टेन्शन’ कुठल्याकुठे पळाले अन् परीक्षेची सुुरुवात ‘झक्कास’ झाली! इंग्रजीचा पहिलाच पेपर देऊन बाहेर निघालेल्या बहुतांश विद्यार्थ्यांनी अशाच प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केली.

पालकांची चलबिचल
एकीकडे विद्यार्थी परीक्षाकेंद्राच्या आत पेपर सोडवित असताना त्यांना सोडण्यास आलेल्या अनेक पालकांनी पूर्ण वेळ केंद्राबाहेरच उभे राहून प्रतीक्षा केली. मुलांच्या परीक्षेचा तणाव पालकांवरच जास्त जाणवून येत होता. त्यांच्या मनातील चलबिचल स्पष्टपणे दिसून येत होती. काही पालकांनी तर मुलांच्या परीक्षेसाठी कार्यालयातून रजाच घेतली आहे. पेपर सुटल्यानंतर पाल्यांची विचारपूस केल्यानंतर पालकांचा तणाव दूर झाला.

Web Title: Nagpur's Traffic Due to the Pre-Examination of HSC students!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा