नागपुरातील विठाबाईचा अखेर ‘पीलिया’ उतरविणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 01:04 AM2018-02-06T01:04:01+5:302018-02-06T01:10:30+5:30
स्टॅम्प पेपरवर आजार बरा करण्याच्या हमी देणाऱ्या विठाबाईच्या अवैध जाहिरातीच्या पोस्टरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटना रस्त्यांवर उतरल्या आहेत. लोकांचा रोष विचारात घेता सोमवारी सकाळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गेटसमोरील पोस्टर हटविण्यात आले. शहराला विदू्रप केल्याप्रकरणी बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत झोन कार्यालयांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्टॅम्प पेपरवर आजार बरा करण्याच्या हमी देणाऱ्या विठाबाईच्या अवैध जाहिरातीच्या पोस्टरमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असल्याने शहरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. सामाजिक संघटना रस्त्यांवर उतरल्या आहेत. लोकांचा रोष विचारात घेता सोमवारी सकाळी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या गेटसमोरील पोस्टर हटविण्यात आले. शहराला विदू्रप केल्याप्रकरणी बजाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनानेही याची गंभीर दखल घेत झोन कार्यालयांना कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे विठाबाईचा ‘पीलिया’ उतरणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय नितीन गडकरी यांनी नागपूरला स्मार्ट सिटी करण्याचा संकल्प केला आहे. महापालिकेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा, घाण अथवा विदू्रपीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वच्छतादूत नियुक्त करण्यात आले आहे. असे प्रयत्न सुरू असताना विठाबाईच्या जाहिरातीचे अवैध पोस्टर लावून शहरातील भिंती व सार्वजनिक ठिकाणे विदू्रप करण्याचा प्रयत्न होत असल्याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. याची दखल घेत महापालिका प्रशसानाने संबंधित अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश दिले आहे. तर बजाजनगर पोलिसांनी स्वत: स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे.
शहरातील विनाअनुमती पोस्टर, बॅनर वा जाहिराती लावणे नियमानुसार गुन्हा आहे. महापालिकेची अनुमती घेतली नसल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येईल. अशी माहिती महापालिकेच्या जाहिरात विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता काळे यांनी दिली. पीलिया, पोटदुखी, अॅसिडिटी हे आजार तीन दिवसात कायमस्वरूपी बरे करण्याची हमी विठाबाई बोके नावाच्या ५५ वर्षीय महिलेने घेतली आहे. यासाठी विठाबाई रुग्णाला बरे होण्याची स्टॅम्प पेपरवर हमी लिहून देण्यास तयार असल्याबातचे पोस्टर शहरभरात ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. मेडिकल सायन्सला आव्हान देण्याचाच हा प्रकार असल्याने याचा सर्वत्र निषेध व्यक्त केला जात आहे.
दोषीवर कारवाईचे निर्देश
उपराजधानीची स्मार्ट सिटीच्या दिशेन वाटचाल सुरू आहे. स्वच्छ शहराच्या यादीत अग्रक्रमांकासाठी नागरिकांच्या सहकार्याने महापालिका प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. असे असतानाच अवैध पोस्टर लावून शहर विदू्रप करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण कायद्यानुसार संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश झोनच्या सहायक आयुक्तांना दिले आहे.
अश्विन मुदगल, आयुक्त
लोकमतच्या वृत्ताची सामाजिक संस्थेकडून दखल
सार्वजनिक ठिकाणी पोस्टर लावून शहराला विदू्रप करण्याबाबतच्या लोकमतच्या वृत्ताची दखल घेत ग्राहक कल्याण समिती महाराष्ट्र राज्यतर्फे याचा निषेध करण्यात आल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आशिष अटलोए यांनी दिली. तसेच प्रतापनगर चौकातील सार्वजनिक मालमत्तेवरून व खांबावरून पोस्टर हटविले. यावेळी आशिष अटलोए, सचिव शीलदेव दोडके, तसेच अजीत शाह, अशोक गाडेकर, सचिन सोमकुंवर, जिनेश बानुगरीया, अरुण उगले, कुमकुम तिवारी, सुहास खरे, श्रीराम वाढई यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.