नागपुरात ‘आपली बस’ सेवा तीन तास ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 10:42 AM2018-02-09T10:42:51+5:302018-02-09T10:45:33+5:30
नागपूर महापालिकेकडे २७.७२ कोटी थकल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरांनी गुुरुवारी दुपारी अचानक संप पुकारला. तीनतास आपली बस सेवा ठप्प पडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहर बससेवा चालविण्यात अपयश आल्याने वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट प्रा.लि.यांचा करार गेल्यावर्षी रद्द करण्यात आला. शहरातील प्रवांशांना उत्तम दर्जाची सेवा मिळावी यासाठी ग्रीनबससह चार नवीन आॅपरेटर नेमण्यात आले़ परंतु महापालिकेच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे वर्षभरानंतरही बससेवा सुरळीत झालेली नाही. महापालिकेकडे २७.७२ कोटी थकल्याने रेड बसच्या तीन आॅपरेटरांनी गुुरुवारी दुपारी अचानक संप पुकारला. तीनतास आपली बस सेवा ठप्प पडल्याने हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
बस आॅपरेटर कंपन्यांपैकी हंसा आॅपरेटर कंपनीचे ९ कोटी ६७ लाख, ट्रॅव्हल टाईम कंपनीचे ९ कोटी तर आऱ के़ सिटीबस आॅपरेटरचे ९ कोटी ५ लाख रुपये महापालिकेकडे थकीत आहे़ महापालिकेकडून वेळेवर रक्कम मिळत नसल्याने बस कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन देता येत नाही.यामुळे आॅपरेटर्सनी संपाचे हत्यार उगारले. अचानक बससेवा ठप्प पडल्याने शहरातील प्रवासी बस स्थानकावर अडकले. काहींनी जादा पैसे मोजून आॅटोने जाणे पसंत केले. दुपारी ३.३० पासून ६.३० दरम्यान बसेस उभ्या होत्या. अखेर बस आॅपरेटर व परिवहन व्यवस्थापक यांच्यातील वाटाघाटीनंतर तीन आॅपरेटरला प्रत्येकी ५० लाख असे दीड कोटी तात्काळ देण्याचा निर्णय झाल्याने बसेस सुरू झाल्या.
महिन्याला सहा कोटींचा बोजा
आपली बससेवा ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालविणे अपेक्षित आहे. मात्र बससेवा चालविण्यासाठी नियुक्त सर्व आॅपरेटरला दर महिन्याला ११ कोटी रुपये द्यावे लागतात. तर तिकिटांच्या माध्यमातून महापालिकेच्या तिजोरीत महिन्याला सुमारे पाच कोटी जमा होतात. त्यामुळे महिन्याला सहा ते सात कोटीचा तोटा सहन करावा लागत आहे़
दुसरीकडे बसवरील जाहिराती वा अन्य माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी निर्देश दिल्यानंतरही परिवहन विभाग काहीच करीत नाही, जाहिरात विभागाला उत्पन्न मिळत असल्याचा आरोप परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला़
डिझेल संपल्याने बसेस उभ्या
डिझेल संपल्याने मोरभवन येथे २० ते २५ बसेस उभ्या होत्या. बसचा संप नव्हता, चर्चेनंतर आॅपरेटरने बसेस सुरू केल्याचे परिवहन समिती सभापती बंटी कुकडे यांनी सांगितले़ मात्र आॅपरेटर कंपन्यांच्या सांगण्यावरूनच ड्रायव्हर, कंडक्टरला बस थांबविण्याचे निर्देश दिले होते़ अशाप्रकारे नोटीस न देता बस थांबविणे नियमबाह्य असल्यामुळे संघटनेनेच बस ड्रायव्हर, कंडक्टर्सला समजावून बससेवा सुरू केली, असे कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी व कर्मचारी संघटनेचे (भारतीय कामगार सेना) सचिव अंबादास शेंडे यांनी सांगितले़
सभापतींचा शिवसेनेवर निशाणा
शहर बस कर्मचाऱ्यांची संघटना शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार संघटनेच्या नेतृत्वात कार्यरत आहे़ शहर बसच्या कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे, यासाठी संघटना लढा देत आहे़ शहर बसचे कर्मचारी महापालिकेचे नसून आॅपरेटरने नियुक्त केलेले आहेत. मोटार ट्रान्सपोर्टमध्ये कार्यरत कर्मचारी व महापालिका कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनासंदर्भात वेगवेगळ्या अधिसूचना आहेत़ त्यामुळे शहर बस कर्मचाऱ्यांकरिता किमान वेतन निश्चिती करण्यासाठी उद्योग विभागाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ या खात्याचे मंत्री शिवसेना नेते सुभाष देसाई आहे़ परिवहन विभागाकडून सातत्याने पाठपुरावा करूनही त्यांच्याच पक्षाची संघटना असूनही या विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही असा निशाणा सभापती बंटी कुकडे यांनी पत्रकारांशी चर्चा करताना साधला. दुसरीकडे बसवरील जाहिराती वा अन्य माध्यमातून उत्पन्न वाढविण्यासाठी निर्देश दिल्यानंतरही परिवहन विभाग काहीच करीत नाही, जाहिरात विभागाला उत्पन्न मिळत असल्याचा आरोप परिवहन समितीचे सभापती बंटी कुकडे यांनी केला़.