एसटीच्या डिझेलसाठी नागपूरवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:08 AM2021-07-27T04:08:45+5:302021-07-27T04:08:45+5:30
उमरेड : कोरोनाच्या चक्रव्यूहानंतर अद्याप एसटीची चाके जागेवर आलेली नाही. प्रवाशांमध्ये कमालीची घट, वाढलेल्या डिझेल दरामुळे भरमसाठ खर्च आणि ...
उमरेड : कोरोनाच्या चक्रव्यूहानंतर अद्याप एसटीची चाके जागेवर आलेली नाही. प्रवाशांमध्ये कमालीची घट, वाढलेल्या डिझेल दरामुळे भरमसाठ खर्च आणि कमी उत्पन्न या कारणांमुळे एसटी महामंडळ तोट्यात चालले आहे. अशातच नागपूर जिल्ह्यातील आगारांमधून धावणाऱ्या एसटीमध्ये डिझेल भरण्यासाठी नागपूरवारी करावी लागत आहे. जिल्ह्यातील प्रत्येक आगाराला नागपूर गणेशपेठ येथील आगारातून डिझेल भरावे लागते. यासाठी आगार व्यवस्थापकांना हिशेब, जुळवाजुळव आणि योग्य नियोजन आखण्याची कसरत पार पाडावी लागत आहे.
उमरेड आगारातून आजमितीस ३० एसटी बसेस आणि त्यांच्या १२५ फेऱ्या सुरू आहेत. या आगारात एकूण ४६ एसटी उपलब्ध असून, कोरोनामुळे प्रवासी घटले आहेत. सध्या केवळ मुख्य मार्गांवर बसफेऱ्या सुरू असून, ग्रामीण भागात अद्यापही एसटी रुळावर यायची आहे.
हिंगणघाट, वर्धा, चिमूर, भिवापूर, ब्रह्मपुरी, गडचिरोली, पवनी, बुटीबोरी, यवतमाळ, माहूर, पूसद, अमरावती तसेच मोठ्या प्रमाणावर नागपूर आदी ठिकाणी उमरेडच्या आगारातून एसटी सर्वत्र धावतात. उमरेड आगारातून दररोज नऊ हजार किलोमीटर एसटी धावत आहे. यामध्ये साधारणत: २ हजार लिटर डिझेलचा वापर दररोज होतो. प्रति लिटर डिझेलमागे जवळपास ५ किलोमीटर एसटी धावते. आगारातच डिझेल पंपची सुविधा असली तरीही या डिझेल पंपामध्ये डिझेल बोलविण्यासाठी आगाराकडे पुरेसा पैसा नाही. यामुळे मागील काही महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्वच आगाराची अशीच दयनीय अवस्था झाली आहे.
--------
आधी डिझेल भरा
नागपूर वगळता अन्य गावांत एसटी पाठवायची असल्यास अडचण निर्माण होते. अशावेळी नागपूरला फेरी पाठवावी लागते. त्याच एसटीमध्ये आधी डिझेल भरायचे आणि मग परत आगारातून अन्य ठिकाणी बस पुढच्या फेरीला पाठवायची, अशी कसरत प्रत्येक आगारास करावी लागत आहे. याबाबत उमरेड आगाराचे व्यवस्थापक संजय डफरे यांच्याशी संपर्क साधला असता, पूर्वी गरजेनुसार आगारातील पंपासाठी डिझेल नियमित बोलविले जात होते. यासाठी संपूर्ण प्रक्रिया सुद्धा आगारातूनच केली जात होती, आता निधीअभावी हे संकट ओढवले असून, निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना आम्ही करीत आहोत.
--
ग्रामीण भागातील बहुसंख्य नागरिक शहरात महत्त्वपूर्ण खरेदीसाठी येत असतात. अशावेळी केवळ नागपूरच्याच बसफेऱ्या अधिक प्रमाणात सुरू ठेवून उपयोगाचे नाही. यामुळे आता गावखेड्यात सुद्धा एसटीच्या फेऱ्या सुरू करणे गरजेचे असून, याकडे तातडीने व गांभीर्याने लक्ष द्यावे.
रामेश्वर सोनटक्के, उमरेड
---
उमरेड आगारातील डिझेल पंप. या पंपावरून सध्या डिझेल पुरवठा बंद आहे. सध्या नागपूर येथून एसटीमध्ये डिझेल भरून लालपरी धावत आहे.