नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2022 13:36 IST2022-03-07T13:16:29+5:302022-03-07T13:36:25+5:30
यावेळी चित्रपटातील डायलॉग ‘झुंड नहीं ये टीम है’च्या घोषणांनी परिसर निनादून निघाला. ढोलताशांच्या गजरात चित्रपटातील सहकलावंतांनी तुफान डान्स केला. अर्थात, नागपूरकरांनीही त्यास साथ दिली.

नागपुरी माहोल... ढोलताशांच्या गजरात 'झुंड'चे कलावंत नाचतात तेव्हा !
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्लम सॉकरचे संस्थापक विजय बारसे यांच्या आयुष्यावर बेतलेल्या ‘झुंड’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या कलावंतांचा उत्साह आणि नागपूरकरांचा प्रतिसाद प्रचंड होता.
नागराज मंजुळे, आकाश ठोसर व चित्रपटातील कलावंतांची ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चित्रपटातील डायलॉग ‘झुंड नहीं ये टीम है’च्या घोषणांनी परिसर निनादून निघाला. ढोलताशांच्या गजरात चित्रपटातील सहकलावंतांनी तुफान डान्स केला. अर्थात, नागपूरकरांनीही त्यास साथ दिली.
चित्रपटाचा प्रीमिअर शो रविवारी बुटी सिनेप्लेक्समध्ये झाला. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक नागराज मंजुळे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, गिरीश गांधी, अभिनेता आकाश ठोसर, अभिषेक पॉल आदी उपस्थित होते.
नागपूरच्या मुलांशिवाय चित्रपट शक्यच नव्हता - मंजुळे
नागराज मंजुळे म्हणाले, या चित्रपटाची कथाच मुळी नागपुरातील सामाजिकदृष्ट्या दुर्लक्षित मुलांची आणि त्यांना घडविणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याची आहे. भाषा, लहजा यामुळे हा सिनेमा नागपूरच्या मुलांशिवाय शक्यच नव्हता. विजय बारसे यांच्यासोबतच त्यांचा शिष्य अखिलेश पॉल, हरियाणा येथील बॉबी यांचा संघर्ष यात आहे. चित्रीकरण सुरू असतानाच सगळ्यांना सिनेमा चित्रपटगृहात पाहण्याचे आवाहन करत होतो. मात्र, मधली दोन-तीन वर्षे कोरोनामुळे प्रदर्शन रखडले. आता तो प्रदर्शित झाला आणि उत्तम प्रतिसाद मिळतोय.
नितीन गडकरींनीही केलं कौतुक
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळात वेळ काढून चित्रपटाच्या प्रीमियरला हजेरी लावली. नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यांना मी प्रशस्तिपत्र देण्याची गरज नाही. यापूर्वीच फिल्म इंडस्ट्रीने त्यांना त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र दिले आहे. झुंड ही अत्यंत सुंदर कलाकृती आहे. लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. त्यांनी छोट्या कलाकारांना मोठी संधी दिली असून हे कलाकार भविष्यात चांगलं नाव कमावतील, अशा शब्दात गडकरी यांनी नागराज मंजुळेचं भरभरून कौतुक केलं.
कधी मी लोकांसाठी उभे राहायचो, आज माझ्यासाठी लोक उभे आहेत. याचे श्रेय नागराज मंजुळे यांना. लव्ह यू नागपूर.
- अखिलेश पॉल, अभिनेता