नाईक घराण्यातील नीलय यांना भाजपाकडून उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:16 AM2018-07-05T00:16:49+5:302018-07-05T00:16:58+5:30
राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठ राहिलेल्या पुसदच्या (जि. यवतमाळ) नाईक घराण्यातील अॅड. नीलय नाईक यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर, विद्यमान आमदार भाई गिरकर, नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर आणि रमेश पाटील यांनाही भाजपाने संधी दिली आहे.
नागपूर : राज्याच्या राजकारणात अनेक वर्षे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसनिष्ठ राहिलेल्या पुसदच्या (जि. यवतमाळ) नाईक घराण्यातील अॅड. नीलय नाईक यांना भाजपाने विधानपरिषदेची उमेदवारी दिली आहे. पशुसंवर्धन मंत्री व रासपाचे नेते महादेव जानकर, विद्यमान आमदार भाई गिरकर, नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष राम पाटील रातोळीकर आणि रमेश पाटील यांनाही भाजपाने संधी दिली आहे. शिवसेनेने अनिल परब यांना आधीच उमेदवारी दिली असून दुसरा उमेदवार म्हणून पक्ष प्रवक्त्या मनीषा कायंदे यांना उमेदवारी देण्याचे जवळपास निश्चित केले आहे.
भाजपाकडून उमेदवारी मिळालेले नीलय नाईक यांनी दीड वर्षांपूर्वी भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत. माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांचे ते नातू तर माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक व पुसदचे विद्यमान आमदार व माजी मंत्री मनोहर नाईक यांचे ते पुतणे आहेत. बंजारा समाजाच्या व्होट बँकेवर नजर ठेवून भाजपाने नीलय यांना उमेदवारी दिल्याचे मानले जाते.
नांदेड जिल्हा भाजपाचे अध्यक्ष असलेले रातोळीकर हे निष्ठावंत भाजपाजन मानले जातात. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड जिल्ह्याला भाजपाने विधान परिषदेत प्रतिनिधित्व दिले आहे. भाजपाचे अन्य एक उमेदवार रमेश पाटील हे कोळी समाजाचे नेते आहेत. त्यांना ऐनवेळी भाजपात आणून उमेदवारी देण्यात आली आहे. ते बांधकाम व्यावसायिक आहेत.
११ जागांसाठी १६ जुलैला ही निवडणूक होत आहे. काँग्रेसने विद्यमान सदस्य शरद रणपिसे आणि यवतमाळ जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांना तर राष्ट्रवादीने बाबाजानी दुर्रानी यांना उमेदवारी दिली आहे. विद्यमान सदस्य शेकापचे जयंत पाटील हेही रिंगणात असतील.
ही निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असले तरी राजकीय खेळीचा भाग म्हणून भाजपाकडून उद्या पृथ्वीराज देशमुख यांचा सहावा अर्ज भरला जाऊ शकतो. तो दबावतंत्राचा एक भाग असेल. अन्य कुठल्याही पक्षाने जादाचा उमेदवार उभा केला तर भाजपाकडून सहावा उमेदवार कायम राखला जाईल. मात्र, अन्य कुणीही जादाचा उमेदवार दिला नाही तर भाजपाचाही सहावा उमेदवार माघार
घेईल.