ओशो यांच्यावर जगात पहिली पीएचडी करण्याऱ्या नयना पांडे-धवड यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:49 AM2019-09-15T00:49:11+5:302019-09-15T00:50:38+5:30
शिक्षिका, लेखिका, पत्रकार, विदर्भ आंदोलन व पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या डॉ. नयना पांडे-धवड यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या दाभा, ठाकरे ले-आऊट येथील राहत्या घरी ब्रेन ट्युमर आजाराने निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिक्षिका, लेखिका, पत्रकार, विदर्भ आंदोलन व पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या डॉ. नयना पांडे-धवड यांचे शनिवारी सकाळी ९ वाजता त्यांच्या दाभा, ठाकरे ले-आऊट येथील राहत्या घरी ब्रेन ट्युमर आजाराने निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती अशोक पांडे, मुलगा निसर्ग व मोठा आप्त परिवार आहे.
शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला राजकीय, सामाजिक, शैक्षणिक यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
डॉ. नयना धवड-पांडे या भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्यासोबत प्रत्येक आंदोलनात सक्रिय होत्या. स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी त्यांनी गांधीबाग येथील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर सात दिवस उपोषण केले होते. विदर्भ जनता काँग्रेसतर्फे त्यांनी रामटेक येथून लोकसभेची निवडणूकही लढविली होती. त्यांच्यावर आचार्य ओशोंचा प्रभाव होता. डॉ. नयना धवड यांनी ओशो यांच्यावर जगात पहिली पीएचडी करण्याचा मान पटकावला आहे. ही पीएचडी लवकरच पुस्तकरूपात येऊ घातली आहे. ती इंग्रजीमध्ये येणार आहे. डॉ. नयना धवड यांचे ओअॅसिस हे ललित संग्रह प्रकाशित झाले असून, ते चांगलेच गाजले आहे. यासोबत त्यांचे युगाधीश हे पुस्तकही लवकरच येऊ घातले आहे.