नागपुरात नाल्याची भिंत पडली; घरांना धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2020 08:01 PM2020-07-21T20:01:27+5:302020-07-21T20:03:08+5:30
दक्षिण- पश्चिम नागपुरातील प्रभाग ३५ मधील नरेंद्रनगर लगतच्या बच्चू सिंग ले- आऊट येथील नाल्याची १०० ते १२५ मीटर लांबीची भिंत पडली. यामुळे नाल्याच्या काठावरील आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण- पश्चिम नागपुरातील प्रभाग ३५ मधील नरेंद्रनगर लगतच्या बच्चू सिंग ले- आऊट येथील नाल्याची १०० ते १२५ मीटर लांबीची भिंत पडली. यामुळे नाल्याच्या काठावरील आजूबाजूच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. नाल्याला पूर आल्यास कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना होण्याची शक्यता असल्याने परिसरातील लोकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
पुराच्या पाण्याने भिंत पडल्यानंतर काठावरील माती वाहून गेल्याने रमेश नागलकर, भरत राठोड,सुरेश पाल, मनीष पाल व भूषण कडू आधीच्या घरांना धोका निर्माण झाला आहे. तसेच तातडीने भिंत न बांधल्यास समोरील भिंतसुद्धा पडण्याची शक्यता आहे.
नाल्याला पूर आल्यास कोणत्याही क्षणी घराच्या भिंती पडण्याची शक्यता आहे. रात्रीच्या सुमारास पूर आल्यास जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या परिसरातील कुटुंबे दहशतीत रात्र काढत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात शहरातील नालेसफाई केली जाते. या नाल्याची जेसीबीने सफाई करताना दगडाची जुनी भिंत नादुरुस्त झाली होती झाली. ही भिंत तातडीने दुरुस्त करण्याची मागणी परिसरातील लोकांनी महापालिका झोन कार्यालय तसेच मुख्यालयाकडे केली होती. तसेच नगरसेवकांनाही निवेदन दिले होते. मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही. गेल्या तीन दिवसांपूर्वी झालेल्या आलेल्या पुरात दगडाची भिंत पडली.
गेल्या महिन्यात बजेरिया मारवाडी चाळ नाल्याची दीडशे मीटर लांबीपर्यंतची भिंत पडली होती. यामुळे आजूबाजूच्या घरांनाही धोका निर्माण झाला.
नाल्याच्या भिंतीचे सर्वेक्षण होण्याची गरज
नागपूर शहरात २२७ नाले आहेत. या नाल्यांना संरक्षण भिंती उभारण्यात आल्या आहेत. परंतू मागील काही वर्षांत देखभाला दुरुस्ती झाली नसल्यामुळे त्या तकलादू झाल्या आहेत. पावसाळ्यात पुरामुळे शिकस्त संरक्षण भिंती कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या नाल्यांच्या भिंतीचे सर्वेक्षण करून शिकस्त भिंती तातडीने दुरुस्त करण्याची गरज आहे.