नलिनी नावरेकर ‘जीवनगौरव’, तर रत्नाताई कांबळे यांना ‘कार्यगौरव’; राज्यस्तरीय ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कारांचे वितरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 08:29 AM2022-05-15T08:29:43+5:302022-05-15T08:30:45+5:30
महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ म्हणून उदयास आलेल्यांचा गौरव ‘लोकमत’च्या वतीने ‘लोकमत सखी सन्मान’ने करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: लोकमत वृत्तपत्र समूहाच्या वतीने लोकमत नागपूर आवृत्तीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त शनिवारी नागपुरातील हॉटेल सेंटर पॉइंट येथे आयोजित नवव्या ‘लोकमत वुमेन समिट’मध्ये नाशिक येथील ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या नलिनी नावरेकर यांना ‘मातोश्री वीणादेवी दर्डा जीवनगौरव’, तर अहमदनगरच्या रत्नाताई कांबळे यांना ‘सौ. ज्योत्स्ना दर्डा कार्यगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यासोबतच महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने देशपातळीवर होत असलेल्या कार्याला व्यासपीठ मिळवून देताना आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजापुढे दीपस्तंभ म्हणून उदयास आलेल्यांचा गौरव ‘लोकमत’च्या वतीने ‘लोकमत सखी सन्मान’ने करण्यात आला.
‘सामाजिक’ क्षेत्रातील गौरवास्पद कामगिरीसाठी अमरावती येथील पद्मश्री डॉ. स्मिता काल्हे, ‘शैक्षणिक’ क्षेत्रातील कामगिरीसाठी अहमदनगर येथील मीनाताई जगधने, ‘शौर्य’ श्रेणीत सोलापूर येथील मोहिनी भोगे, ‘क्रीडा’ क्षेत्रात औरंगाबाद येथील साक्षी चितलांगे, ‘आरोग्य’ क्षेत्रात अकोला येथील डॉ. तारा माहेश्वरी, ‘व्यवसाय-उद्योग’ क्षेत्रात नागपूरच्या रश्मी कुलकर्णी, तर ‘सांस्कृतिक’ क्षेत्रात नाशिक येथील गायिका रागिणी कामतीकर यांचा ‘लोकमत सखी सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
परिषदेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, अभिनेत्री ईशा कोप्पीकर, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह, भारतीय मुस्लीम महिला आंदोलनाच्या संस्थापक झाकिया सोमण, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इनोव्हेशन इन्क्युबेशन सेंटरच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर, एअर इंडिया लिमिटेडच्या कॅप्टन शिवानी कालरा, बालतस्करीविरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्या सुनीता कर, अभिनेत्री रसिका दुग्गल, संजना संघी, अलोपेसियाग्रस्त महिलांसाठी लढा देणाऱ्या कार्यकर्त्या केतकी जानी यांनी विविध परिसंवादांत सहभागी होत महिलांच्या सर्व क्षेत्रांतील गरुडझेपेचा प्रवास उलगडला. श्वेता शेलगावकर यांनी सूत्रसंचालन केले.
महिला विकासासोबत आर्थिक साक्षरता महत्त्वाची : विजय दर्डा
महिलांनी परिश्रम व दृढनिश्चयातूून विविध क्षेत्रांत यश प्राप्त केले आहे. प्रत्येक महिलेच्या मनात एक नवी आशा असते. ती साकारण्यासाठी ‘लोकमत वुमेन समिट’च्या माध्यमातून आमचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काळात महिला विकासासोबतच त्यांच्या आर्थिक साक्षरतेवर, बचतीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे मत लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन, माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’ने २०११ मध्ये ‘वुमन समिट’च्या माध्यमातून ‘बेटी बचाव’चा नारा दिला. पुढे २०१५ मध्ये केंद्र सरकारने त्यावर ठोस पावले उचलली. याशिवाय नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रश्न, त्यांचा संघर्ष, आदी मुद्द्यांवरही प्रकाश टाकण्यात आला. अजूनही बहुसंख्य मुली शिक्षणापासून वंचित असल्याचे सांगत मुलामुलींत भेद करू नका, असे आवाहनही त्यांनी केले.
मुलींना ‘ग्लास सिलिंग’ कशी तोडायची ते सांगा : मनीषा म्हैसकर
आईकडून लहानपणी मुलींना सिंड्रेला व तिच्या ग्लास सँडलवरून तिचा शोध घेणाऱ्या राजकुमाराची गोष्ट सांगितली जाते. मात्र, आता सिंड्रेलाच्या ग्लास सँडलची गोष्ट सांगू नका, तर या समाजाने घातलेली विविध बंधने (ग्लास सिलिंग) कशी तोडायची, याबद्दल सांगा, असे आवाहन पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांनी केले. भूतकाळ निघून गेला आहे. वर्तमान कुणीच पाहिलेला नाही. त्यामुळे आजचा क्षण संपूर्णपणे जगायला शिका, अशी कळकळीची सादही त्यांनी घातली. म्हैसकर यांनी प्रशासकीय सेवेत विविध जबाबदाऱ्या पार पाडताना महिला अधिकारी म्हणून आलेले चांगले-वाईट अनुभव मांडले. कार्यशैलीवरून महिलांकडे नकारात्मकतेने बघितले जाते. मात्र, महिलांनी त्यांच्या कर्तृत्वातून प्रशासकीय जबाबदारी सांभाळण्यासही त्या सक्षम असल्याचे सिद्ध केले, असेही त्यांनी सांगितले.
महिला सशक्तीकरण धोरण सक्षमपणे राबविणार : नितीन राऊत
- सर्वच क्षेत्रांत स्त्रियांचे कर्तृत्व पुरुषांपेक्षा सरस ठरत आहे. स्त्रीशक्तीने देशाला सक्षम पंतप्रधान, राष्ट्रपती व मुख्यमंत्रीही दिले आहेत. आता तर कोणत्याही परीक्षेत मुलीच टॉप येताना दिसत आहेत.
- महिलांच्या या प्रगतीत महाविकास आघाडी सरकारही ताकदीने सोबत आहे, असे सांगत येत्या काळात राज्य सरकारतर्फे महिला सशक्तीकरण धोरण आणखी सक्षमपणे राबविले जाईल, अशी ग्वाही ऊर्जामंत्री व नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
- महात्मा जोतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुढाकारामुळे मुली शिकू शकल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेमुळे लैंगिक समानता प्राप्त झाली, असेही त्यांनी सांगितले.
एकमेकींचा आदर करून आधार व्हा : उषा काकडे
स्त्री ही नेहमीच सक्षम राहिली आहे. तिच्यात जग घडविण्याचे सामर्थ्य आहे. आता इतरांना सक्षम करण्यासाठी स्त्रियांनी पुढाकार घ्यावा. स्त्रियांनी एकमेकींचा आदर करून एकमेकींचा आधार बना, असे आवाहन ग्रॅव्हिटास फाउंडेशनच्या अध्यक्ष उषा काकडे यांनी केले. समाजात महिलांना आजही समान हक्क मिळतो का, घरातील निर्णय प्रक्रियेत त्यांचे स्थान काय आहे, त्या खरंच स्वतंत्र आहेत का, यावर समाजाने अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नागपुरात होत असलेल्या या नवव्या पर्वातून देशभरात महिला सन्मानाची साद जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. स्व. ज्योत्स्ना दर्डा यांनी ‘सखी मंच’च्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी केलेल्या कार्याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
संघर्ष करण्याचे बळ मुलीला आईनेच द्यावे - रुपाली चाकणकर
मुलीचा संघर्ष हा गर्भातूनच सुरू होतो, पण या संघर्षाचा सामना करण्यासाठी मुलींमध्ये ताकद निर्माण करण्याची किमया तिच्या आईने करणे गरजेचे आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केले. त्या म्हणाल्या, कोरोनाच्या काळात शारीरिक समस्या सर्वांनीच अनुभवल्या. मानसिक समस्या चव्हाट्यावर आल्या. सर्वाधिक कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या काळात घडल्या. याच काळात बालविवाह रोखण्यासाठीही मोठा लढा द्यावा लागला. महिलांवरील अत्याचार लक्षात घेता राज्य महिला आयोगाला हेल्पलाइन नंबर सुरू करावा लागला. ‘आयोग आपल्या दारी’ असे उपक्रम राबवावे लागले. महिलांच्या बाबतीत समाजात विकृत मानसिकता झाली, अशी खंत व्यक्त करून पांढरपेशा समाजातही महिला अत्याचाराच्या घटना घडत असल्याची व्यथा मांडली.
रागिणी कामतीकर यांनी मानले सुरेल आभार
सांस्कृतिक श्रेणीतील पुरस्कार विजेत्या गायिका रागिणी कामतीकर यांनी पुरस्कार स्वीकारताना दोन गाणी सादर करत सुरेल आभार मानले. ‘इवलेसे रोप लाविले दारी, तयाचा वेलू गेला गगनावरी’ या गाण्यातून स्व. ज्योत्स्ना दर्डा यांना आदरांजली वाहिली. यासोबतच ‘मेहेक जाऊ मैं, आज मैं ऐसे... दिल है छोटा सा’ हे गीत सादर करत आभार मानले.