नागपुरात नायलॉन मांजाने कापला व्यापाऱ्याचा गळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 09:58 PM2018-12-26T21:58:28+5:302018-12-26T22:02:30+5:30
नायलॉन मांजाने एका व्यापाऱ्याचा गळा आणि अंगठा कापल्या गेला. राजेश जयस्वाल असे जखमीचे नाव आहे. ते नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे विजय जयस्वाल यांचे भाऊ आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी पूर्ण बरे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास व काही खाण्यापिण्यास मनाई केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नायलॉन मांजाने एका व्यापाऱ्याचा गळा आणि अंगठा कापल्या गेला. राजेश जयस्वाल असे जखमीचे नाव आहे. ते नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सचे विजय जयस्वाल यांचे भाऊ आहेत. सध्या त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असली तरी पूर्ण बरे नसल्याने डॉक्टरांनी त्यांना बोलण्यास व काही खाण्यापिण्यास मनाई केली आहे.
जखमीला ओंकारनगर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. या घटनेमुळे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, तो म्हणजे नायलॉन मांजावर प्रतिबंध असला तरी त्याची विक्री सुरू आहे. प्रशासन त्याबाबत उदासीन आहे. त्यामुळे जीवघेणा ठरलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर कुठलाही परिणाम होताना दिसून येत नाही.
मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना दहीबाजार उड्डाण पुलावर घडली. राजेश जयस्वाल यांचे जरीपटका रोडवर बीअर बार आहे. ते जेवणासाठी सायंकाळी ५ वाजता बाईकने आपल्या घरी जात होते. त्याचवेळी दहीबाजार पुलावर राजेश यांना त्यांच्या गळ्यात मांजा अडकल्याचे जाणवले. तेव्हा त्यांनी हाताने मांजा हटवण्याचा प्रयत्न केला. परंतु मांजा नायलॉनचा असल्याने त्यांचा अंगठा व गळा दोन्ही कापल्या गेला. परंतु गळ्यात रुमाल बांधून असल्याने त्यांना केवळ अंगठा कापल्याचे दिसून आले. गळा कापल्याचे त्यांच्या लक्षातच आले नाही. अंगठ्याला दुसरा रुमाल लपेटून ते घरी गेले. घरी पोहोचल्यावर जेव्हा गळ्यातून रुमाल काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा रक्तामुळे रुमाल गळ्यालाच चिकटला. कसाबसा रुमाल काढला तेव्हा मांजाने गळा पूर्णपणे कापल्या गेल्याचे दिसून आले. त्यांना लगेच जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अजनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हेल्मेटमुळे वाचले डोके
दही बाजार पुलावर घडलेल्या या घटनेने सर्वांनाच घाबरवले आहे. परंतु या घटनेने हेल्मेटच्या वापराचा फायदाही दिसून आला. राजेश जयस्वाल यांनी हेल्मेट घातले होते. त्यामुळे त्यांचे डोके मात्र पूर्णपणे सुरक्षित राहिले. हेल्मेट नसता तर चेहरा व डोकेही जखमी झाले असते.
अपघातानंतर कुटुंबीय करताहेत आवाहन
या घटनेनंतर जखमी राजेश जयस्वाल यांच्या कुटुंबीयांनी नागरिकांना नायलॉन मांजाचा वापर करू नका, असे आवाहन केले आहे. नायलॉन मांजा जीवघेणा आहे. राजेश जयस्वालचे मोठे भाऊ विजय जायस्वाल यांनीही नायलॉन मांजाचा वापर करू नका. हेल्मेट घालूनच वाहन चालवा, गळ्यात रुमाल बांधा, असे आवाहन केले आहे.
नायलॉन मांजा विक्रे त्यांवर दंडात्मक कारवाई करणार
मकरसंक्रांतीच्या पर्वावर शहरात सर्वत्र पतंगबाजी होते. बंदी असूनही नायलॉन मांजाचा यासाठी सर्रास वापर केला जातो. या मांज्यामुळे अनेक पक्षी जखमी होतात. तसेच नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. अशा घटना घडू नये यासाठी नायलॉन मांजाची विक्री व वापर करणाऱ्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विक्रेत्यांवर धाडी घालून मांजा जप्त केला जाणार आहे. सोबतच दंडात्मक कारवाई के ली जाणार आहे.
पतंगीसाठी नायलॉन मांजा वापरण्याला बंदी असूनही या धाग्याचा सर्रास वापर केला जातो. यामुळे अनेक जण जखमी होतात. वेळप्रसंगी काहींना जीव गमवावा लागतो. याची दखल घेत आरोग्य विभागातर्फे शुक्रवारपासून शहरात मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी झोननिहाय पथक गठित करण्यात येणार आहे. यात उपद्रव शोध पथकाचे दोन जवान व आरोग्य विभागाचे दोन कर्मचारी अशा चार जणांचे पथक नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर धाडी घालून साठा जप्त करणार आहे. त्यानंतरही नायलॉन मांजाची विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
या संदर्भात आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात झोननिहाय जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सुनील कांबळे यांनी दिली. पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतरही याला आळा बसलेला नाही. त्यामुळे विक्रेत्यासोबतच नायलॉन मांजाचा वापर करणाऱ्यांवरही कारवाई केली जाणार आहे.
विशेष म्हणजे विक्रीवर बंदी असूनही गांधीबाग व सक्करदरा भागात नायलॉन मांजाची जादा दराने विक्री सुरू आहे. याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.