भाजपच्या नावाने बोगस निवडणूक ‘सर्वे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:22 AM2019-01-09T01:22:13+5:302019-01-09T01:24:18+5:30
लोकसभा-विधानसभा निवडणूक जवळ आल्या की राजकीय वातावरणदेखील तापायला सुरुवात होते. उपराजधानीतदेखील असे चित्र तयार होत असून, चक्क भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्वे’ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. दक्षिण नागपूरचा पुढील आमदार कोण असावा, यासंदर्भात हा ‘सर्वे’ आहे. पक्षाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. हा ‘सर्वे’ बनावट असल्याचा दावा करीत पक्षातर्फे पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लोकसभा-विधानसभा निवडणूक जवळ आल्या की राजकीय वातावरणदेखील तापायला सुरुवात होते. उपराजधानीतदेखील असे चित्र तयार होत असून, चक्क भारतीय जनता पक्षाच्या नावानेच एक बोगस ‘ऑनलाईन सर्वे’ सुरू असल्याची बाब समोर आली आहे. दक्षिण नागपूरचा पुढील आमदार कोण असावा, यासंदर्भात हा ‘सर्वे’ आहे. पक्षाने ही बाब गंभीरतेने घेतली आहे. हा ‘सर्वे’ बनावट असल्याचा दावा करीत पक्षातर्फे पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली आहे.
इंटरनेटवर ‘स्ट्रॉपोल’ या नावाने ‘ऑनलाईन सर्वे’चे एक संकेतस्थळ बनविण्यात आले आहे. या संकेतस्थळाच्या मुख्य पृष्ठावरच हा ‘सर्वे’ दक्षिण भाजपातर्फे घेण्यात येत असल्याचे नमूद आहे. ‘२०१९ मध्ये दक्षिण नागपूरचा आमदार कोण असावा’ असा प्रश्न विचारण्यात येत आहे. यात विद्यमान आमदार सुधाकर कोहळे यांच्यासह माजी आमदार मोहन मते, आशिष वांदिले व रवींद्र भोयर यांची नावे आहेत. यापैकी एका नावाची निवड करण्याचे यात सांगण्यात येत आहे. या ‘सर्वे’मध्ये आतापर्यंत ५०७ जणांनी आपले मत व्यक्त केले आहे.
ही बाब लक्षात येताच भाजपचे महानगर सोशल मीडिया सेलतर्फे हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. हा ‘सर्वे’ पक्षाचा नसून कुणी तरी जाणूनबुजून हा प्रकार करीत आहे. संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्यात यावी, असे तक्रारीत नमूद आहे.
गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न
संबंधित ‘सर्वे’ हा गैरसमज पसरविण्याच्या उद्देशाने करण्यात येत आहे. पक्षाशी याचा काहीही संबंध नाही. ‘स्ट्रॉपोल’ हे मोफत संकेतस्थळ असून, वापरासंबंधीच्या दिशानिर्देशानुसार यावर राजकीय ‘सर्वे’ करता येत नाही. शिवाय यात पक्षाचे नाव वापरण्यात आले असल्याने हा ‘आयटी अॅक्ट-२०००’च्या कलम ६६ डी, ६७ तसेच ‘आयपीसी’च्या कलम ४१५ नुसार गुन्हा ठरू शकतो, असा दावा भाजपच्या सोशल मीडिया सेलचे प्रमुख केतन मोहितकर यांनी केला आहे.
पक्षातील स्पर्धा की खोडसाळपणा?
दरम्यान, ही बाब समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. दक्षिण नागपूरसह शहरातील पाच जागांवर उमेदवारीसाठी विद्यमान आमदारांसह इतरही पदाधिकारी इच्छुक आहेत. अशास्थितीत हा ‘सर्वे’ पक्षातील अंतर्गत स्पर्धेतून करण्यात येत आहे की यात बाहेरील तत्त्वांचा खोडसाळपणा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.