‘ई-पास’ नावालाच, कुणीही यावे, टिकली मारून जावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:07 AM2021-04-26T04:07:55+5:302021-04-26T04:07:55+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : शहरासह जिल्ह्यात काेराेना संक्रमणासाेबतच मृत्यूदर वाढत आहे. हे संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाबंदीचा ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरासह जिल्ह्यात काेराेना संक्रमणासाेबतच मृत्यूदर वाढत आहे. हे संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. मात्र, अत्यावश्यक कामासाठी आंतरजिल्हा प्रवास करण्याची काही अटींवर मुभादेखील देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने नागपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या व्यक्तींची तपासणी करण्यासाठी जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात तपासणी नाक्यांची निर्मिती करण्यात आली असून, तिथे नागरिकांची केवळ जुजबी तपासणी केली जात असल्याचे प्रत्यक्ष पाहणीत निदर्शनास आले आहे.
राज्य शासनाने आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या नागरिकांना ‘ई-पास’, त्यांचे थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझेशन या मूलभूत बाबी अनिवार्य केल्या आहेत. यासाठी नागपूर जिल्ह्यातील नागपूर-काटाेल-अमरावती, नागपूर-काेंढाळी-अमरावती, नागपूर-बुटीबाेरी-वर्धा, नागपूर-बुटीबाेरी-चंद्रपूर, नागपूर-भिवापूर-भंडारा, नागपूर-माैदा-भंडारा, नागपूर-रामटेक-तुमसर (भंडारा), नागपूर-देवलापार-जबलपूर (मध्य प्रदेश), नागपूर-सावनेर-केळवद-छिंदवाडा (मध्य प्रदेश), नागपूर-सावनेर-पांढुर्णा-बैतूल (मध्य प्रदेश) या १० महत्त्वाच्या मार्गांवरील सीमांवर आठ तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत.
यातील नागपूर-रामटेक-तुमसर (भंडारा) व नागपूर-सावनेर-केळवद-छिंदवाडा (मध्य प्रदेश) तपासणी नाका अद्याप तयार करण्यात आला नाही. या सर्व तपासणी नाक्यांवर आंतरजिल्हा प्रवास करणाऱ्या व्यक्तींकडून ‘ई-पास’ची तपासणी केली जात असून, थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझेशनवर फारसा भर दिला जात नसल्याचे आढळून आले आहे. या सर्व नाक्यांवर पाेलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पाेलीस अधीक्षक राकेश ओला यांनी नुकतीच जिल्ह्यातील सर्व तपासणी नाक्यांना भेटी देत पाहणी केली आणि नाक्यावरील कामकाजाचा आढावाही घेतला. जिल्ह्यातील हिंगणा, भिवापूर, माैदा, रामटेक, सावनेर या सीमावर्ती तालुक्यातून आडमार्गाने नागपूर जिल्ह्यात दाखल हाेणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही नगण्य आहे.
...
आठ सीमा, सहा कर्मचारी
नागपूर शहरात दाखल हाेणाऱ्या १० मार्गांपैकी आठ मार्गांवर तपासणी नाके तयार करण्यात आले आहेत. या नाक्यांवर प्रत्येकी चार ते सहा कर्मचारी तैनात केले आहेत.
या तपासणी नाक्यांवर प्रत्येक व्यक्तीला विचारपूस केली जाते. मात्र, त्यांचे थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझेशन केले जात नाही. त्यांना ई-पासबाबत विचारणा केली जात नाही.
नागपूर शहर व जिल्ह्यातील काेराेना रुग्णांना भरती करण्यासाठी वर्धा व अमरावतीला नेले जात असल्याने बुटीबाेरी, काेेंढाळी व जलालखेडा येथील तपासणी नाक्यावर २४ तास नागरिकांची वर्दळ असते.
...
मानेगाव (टेक) नाका
नागपूर-जबलपूर महामार्गावरील मानेगाव (टेक) येथील नाक्यावर तीन पाेलीस व एका शिक्षकाची नियुक्ती केली आहे. या नाक्यावर व्यक्तींना ई-पासबाबत विचारणा केली जात नाही. त्यांचे थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझेशन केले जात नाही.
...
खुर्सापार नाका
नागपूर-साैंसर मार्गावरील खुर्सापार व केळवद नाक्यावर प्रवाशांकडील ई-पासची कसून तपासणी केली जाते. या दाेन्ही नाक्यांवर नागपूर जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींची आराेग्य व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांकडून तपासणी केली जाते.
...
जलालखेडा नाका
नागपूर-काटाेल-अमरावती मार्गावरील जलालखेडा येथील नाक्यावर पाेलीस व महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. या नाक्यावर ई-पास असणाऱ्यांचा व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेश दिला जात आहे. या नाक्यावर ई-पास नसलेल्या व्यक्ती आल्या नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.
...
काेंढाळी नाका
नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील काेंढाळी येथील नाक्यावर सहा कर्मचारी तैनात केले आहेत. या नाक्यावर अमरावती व वर्धा जिल्ह्यातून येणाऱ्यांची कसून तपासणी सुरू आहे. मात्र, थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझेशन केले जात नाही.
...
बाेरगाव नाका
नागपूर-भंडारा मार्गावरील बाेरगाव (महादुला) नाक्यावर केवळ पाेलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून, प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जाते. येथे बाहेरून येणाऱ्यांचे स्क्रीनिंग, सॅनिटायझेशन केले जात नाही.
...
भिवापूर नाका
नागपूर-भंडारा-गडचिराेली मार्गावरील भिवापूर येथील नाक्यावर ई-पासची तपासणी केली जात असून, व्यक्तींचे स्क्रीनिंग, सॅनिटायझेशन केले जात आहे. पास नसणाऱ्यांना प्रवेश नाकारला जात असून, लक्षणे आढळून आलेल्या व्यक्तींना भिवापूर येथील काेविड केअर सेंटरमध्ये पाठविले जाते.
...
बुटीबाेरी नाका
नागपूर-वर्धा मार्गावर वडगाव तर नागपूर-चंद्रपूर मार्गावर साेनेगाव (लाेधी) येथे तपासणी नाके तयार केले आहेत. या दाेन्ही नाक्यावर नागपूर जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची थर्मल स्क्रीनिंग केली जात असून, ई-पास तपासणी केली जात आहे.