कोट्यवधींच्या जमिनीवर चढले नासुप्रचे नाव
By admin | Published: July 2, 2016 03:11 AM2016-07-02T03:11:17+5:302016-07-02T03:11:17+5:30
नागपूर सुधार प्रन्यासने १९६१ मध्ये अधिग्रहीत केलेली सुमारे १७ एकर जमीन शेतमालकाच्या वारसांनी भूमाफियाशी हातमिळवणी करून परस्पर विकली.
भूमाफियांना चपराक : अधिकाऱ्यांच्या लढ्याला यश
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने १९६१ मध्ये अधिग्रहीत केलेली सुमारे १७ एकर जमीन शेतमालकाच्या वारसांनी भूमाफियाशी हातमिळवणी करून परस्पर विकली. नासुप्रच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी जमीन परत मिळविण्यासाठी कायदेशीर लढा दिला. त्या लढ्याला शेवटी यश आले. आता संबंधित जमिनीच्या सातबारावर नासुप्रची नोंद करण्यात आली आहे. भूमाफियांना ही एक मोठी चपराक मानली जात आहे.
मौजा बहादुुरा येथील प.ह.नं.३५, नागपूर ग्रामीण खसरा नं. १२, क्षेत्र ६.८५ हे.आर. (१६.९२ एकर ) जमीन नागपूर सुधार प्रन्यासने ड्रेनेज तसेच सिवरेज स्कीम भाग- २ अंतर्गत १९६१ मध्ये जमीन मालक पीरबा श्रावण कुणबी यांच्याकडून अधिग्रहीत करण्यात आली होती. १९६३ मध्ये या जमिनीचा अवॉर्ड करण्यात आला. १९६५ मध्ये संबंधित जमिनीचा नासुप्रला ताबा देण्यात आला. मात्र, पटवारी रेकॉर्डमध्ये याची नोंद करण्यात आली नाही. जमीन मालक पीरबा श्रावण कुणबी यांच्या वारसदारांनी नेमका याचा फायदा घेतला. भूमाफियांशी हातमिळवणी करून संबंधित जमीन उज्ज्वल गोरक्षण ट्रस्ट, बहादुरा यांना विकली. सहा महिन्यांपूर्वी तत्कालीन सभापती सचिन कुर्वे यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी मुख्य अभियंता सुनील गुज्जलवार, कार्यकारी अभियंता संदीप बापट, देवेंद्र गौर यांची टीम तयार करून जमीन परत मिळविण्यासाठी कायदेशीर लढा देण्याचा निर्णय घेतला नागपूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांच्याकडे याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान नासुप्रची बाजू भक्कम करणारी कागदपत्रे सादर करण्यात आली. १८ मे २०१६ रोजी नासुप्रच्या बाजूने निर्णय लागला व संबंधित जमिनीच्या सातबारावर नासुप्रचे नाव नोंदविण्यात यावे, असा आदेश पारित करण्यात आला. त्यानुसार सातबारावर नासुप्रचे नाव नोंदविण्यात आले आहे. नुकतेच नागपूर ग्रामीणचे तहसीलदार यांनी नासुप्रचे कार्यकारी अभियंता, मूल्यांकन विभाग यांच्याकडे नासुप्रचे नाव नोंदविलेला सातबारा सोपविला. नासुप्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या लढ्याला यश आले व कोट्यवधीची जमीन नासुप्रला परत मिळाली. या प्रकरणाच्या निमित्ताने भूमाफियांना मोठी चपराक बसली आहे. (प्रतिनिधी)