नागपूरच्या पोलीस आयुक्तपदासाठी सक्सेना, सिंघल यांचे नाव
By नरेश डोंगरे | Published: October 3, 2023 09:44 PM2023-10-03T21:44:34+5:302023-10-03T21:44:53+5:30
अनुपकुमार आणि रामानंदही चर्चेत : अमितेशकुमार यांची ठाण्यात वर्णी; अपवादात्मक स्थितीत मुंबई किंवा पुण्यात महत्वाची जबाबदारी : लवकरच होणार घोषणा
नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : नवरात्र दसरा, दिवाळीच्या बंदोबस्ताची व्यूहरचना करण्यात व्यस्त असलेल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलात गेल्या काही तासांपासून नवनियुक्ती अन् बदल्यांचे वारे जोराने वाहू लागले आहे. नागपूर पोलीस आयुक्तांसह ठिकठिकाणच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचा विषयही शिर्षस्थ पातळीवर अग्रस्थानी आला आहे. पुढच्या काही तासातच या संबंधाने निर्णय होणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.
राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (डीजीपी) ज्येष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा तेवढी बाकी असल्याची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती आहे. शुक्ला डीजीपी झाल्यास राज्य पोलीस दलाच्या सर्वोच्चपदी विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या महिला आयपीएस अधिकारी ठरणार आहेत. शुक्ला यांच्या नियुक्तीसारखाच महत्वाचा बदल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या होमटाऊन आणि राज्याच्या उपराजधानीतही अपेक्षित आहे. येथील पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचा सेवाकाळ वर्षभरापूर्वीच पूर्ण झाला. येथे ते सप्टेंबर २०२० ला रुजू झाले होते. नागपूरच्या ईतिहासात सर्वाधिक ३७ महिने पोलीस आयुक्तपदी राहण्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर जमा झाला आहे. त्यामुळे त्यांची आता नागपुरातून बदली होणार आहे. सूत्रांच्या मते त्यांना ठाणे येथे प्रमुखपदी नेमले जाणार आहे. त्यात काही अडचण आल्यास अमितेशकुमार यांना मुंबई अथवा पुण्यात महत्वाच्या जागी नियुक्त केले जाणार आहे. त्यांच्या रिक्त पदावर अर्थात नागपूरचे पोलीस आयुक्त म्हणून संजय सक्सेना यांची नियुक्ती होणार असल्याचे सांगितले जाते. राज्यातील महत्वाचे आणि दुसऱ्या क्रमांकाचे पद मानले जाणारे एडीजी लॉ अॅन्ड ऑर्डर म्हणून ते जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी नागपुरात सहपोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळताना अनेक धडाकेबाज कारवाई केल्या होत्या. सक्सेना यांच्या नंतर संजय सिंघल आणि अनुपकुमार यांचीही नावे आहेत. या दोन्ही अधिकाऱ्यांनी नागपुरात पोलीस उपायुक्त म्हणून चांगले काम केले आहे. सक्सेना, सिंघल आणि अनुपकुमार यांच्यासोबतच नागपूरचे संभाव्य पोलीस आयुक्त म्हणून सुनील रामानंद यांचेही नाव चर्चेत आहे.
राजधानी - उपराजधानीतील घोषणा पाठोपाठच
पोलीस महासंचालकपदाची अधिकृत घोषणा झाल्याच्या पाठोपाठच उपराजधानीतील पोलीस आयुक्तांचीही घोषणा होण्याची अपेक्षा आहे. या शिवायही राज्यातील अन्य काही महत्वाच्या पदावर असलेल्यां आयपीएस अधिकाऱ्यांच्या फेरबदलाची घोषणा एकसाथ होणार असल्याची खास सूत्रांची माहिती आहे.