नावाचीच ‘स्टार’ बाकी बेकार !
By admin | Published: August 12, 2015 03:45 AM2015-08-12T03:45:01+5:302015-08-12T03:45:01+5:30
महापालिकेच्या स्टार बस आता नावापुरत्याच ‘स्टार’ राहिल्या आहेत. निम्म्याहून जास्त बस नादुरुस्त असून भंगार
नागपूर : महापालिकेच्या स्टार बस आता नावापुरत्याच ‘स्टार’ राहिल्या आहेत. निम्म्याहून जास्त बस नादुरुस्त असून भंगार झाल्या आहेत. सोमवारी आरटीओने जप्त केलेल्या १६ बसेसच्या ‘तपासणी प्रतिनिवेदनावरून’ पुन्हा एकदा हे स्पष्ट झाले आहे. यामुळे ज्या बसेस रस्त्यावर धावत आहेत त्या धोकादायक आहेत. यातच थकीत कर न भरता शासनाच्या पैशाचा दुरुपयोग करणाऱ्या या बसवर महापालिकेची कृपादृष्टी कायम असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जेएनएनयुआरएम (जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी पुनरुत्थान मिशन) अंतर्गत महापालिकेला २४० बस मिळाल्या होत्या. २३० बस वंश निमयने खरेदी केल्या होत्या. या ४७० बसपैकी प्रादेशिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) दरवर्षी केवळ २३० बसेस योग्यता (फिटनेस) प्रमाणपत्रासाठी येतात.
ही संख्या शहरातील प्रवाशांच्या संख्येच्या तुलनेत फार तोकडी आहे. यामुळे एका बसला दिवसभरात साधारण दहावर फेऱ्या माराव्या लागतात.
परिणामी काही महिन्यातच या बसेस नादुरुस्त होतात. मात्र, वंश निमय मोठ्या दुरुस्तीचा खर्च करीत नसल्याने आहे त्या स्थितीत प्रवाशांचा जीव धोक्यात घेऊन या बसेस धावत असल्याचे चित्र आहे. सोमवारी आरटीओने ज्या १६ बसवर कारवाई केली त्यात प्रत्येक बसमध्ये आरटीओच्या वायुपथकाला १२ ते १५ त्रुटी आढळून आल्या.
दार तुटलेले
४सोमवारी जप्त करण्यात आलेल्या सर्वच स्टार बसमधील दारे तुटलेल्या अवस्थेत आहेत. अनेक दारे बंद-चालू होत नाही. काही दारांना तारेने बांधलेले आहे तर काहींना खालून विट लावून उभ्या केलेल्या आहेत. विशेष म्हणजे, जेएनएनयुआरएमने दिलेल्या बसेसमधील दारे स्वयंचलित होती, परंतु त्यांचीही अवस्था इतरांसारखीच झाल्याचे बसचे कर्मचारी सांगतात.
कुशन नसलेली आसने
४शहरातील रस्त्यांवर धावत असलेल्या बहुसंख्य स्टार बसमधील आसने तुटलेल्या अवस्थेत आहे. विशेष म्हणजे, सर्वच बसमधील आसनांना कुशनच नाही. कडक प्लास्टिकवर प्रवाशांना बसावे लागते. काहींना तर भोके पडलेली आहेत तर काहींचे लोखंड बाहेर निघाले आहे. या अवस्थेतही प्रवासी बसतात.