नामांकित ज्वेलर्सला कर्मचाऱ्यानेच लावला चुना; ५७ लाखांच्या सोन्याच्या बिस्कीटांवर डल्ला
By योगेश पांडे | Published: November 20, 2023 05:36 PM2023-11-20T17:36:59+5:302023-11-20T17:37:24+5:30
ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये लाखोंचा ऐवज असल्याने सर्वसाधारणत: विश्वासू कर्मचाऱ्यांची भरती करण्यावरच भर दिला जातो.
नागपूर : ज्वेलर्सच्या दुकानांमध्ये लाखोंचा ऐवज असल्याने सर्वसाधारणत: विश्वासू कर्मचाऱ्यांची भरती करण्यावरच भर दिला जातो. मात्र शहरातील एका नामांकित ज्वेलर्सच्या दुकानात तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानेच विश्वासघात केला. ग्राहकांना दाखविण्यासाठी घेऊन गेलेल्या सुमारे ५७ लाख किंमतीच्या सोन्याच्या बिस्कीट व नाण्यांवर त्याने डल्ला घातला. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.
शंकरनगर येथील उत्तर अंबाझरी मार्गावर करण कोठारी ज्वेलर्स प्रा.लि. आहे. ग्राहकांसाठी घरपोच सेवादेखील आहे. ग्राहकांना रिफाईड गोल्ड बिस्कीट किंवा सिक्के दाखविण्याकरीता दुकानातील कर्मचारी घरी जातात. कर्मचाऱ्यांच्या नावाने अगोदर चालान बनविण्यात येते व कर्मचारी ते सोने ग्राहकांना घरी जाऊन दाखवितात. जर ते सोने ग्राहकांना पसंत पडले तर कर्मचारी परत येऊन बिल बनवितात. जर ग्राहकांना पसंत पडले नाही तर परत सोने व चालान जमा करण्यात येते. या प्रक्रीयेला १५ दिवस लागतात व त्यानंतर तपासणी होते. कौशल रजनीकांत मुनी (४१, हिमालय एम्पायर, ए विंग, बेलतरोडी) याने यात प्रक्रियेत फसवणूक केली. कौशल हा मुळचा मुंबईतील सीपी टॅंक येथील सिंधी गल्लीतील मुलजी ठक्कर बिल्डींगमधील निवासी आहे. त्याने १८ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर दरम्यान सहा चालान बनविले व ५७.६० लाखांची सोन्याची बिस्कीटे व नाणे घेऊन गेला. मात्र त्यानंतर त्याने ते सोने दुकानात परतदेखील केले नाही व तो कामावरदेखील आला नाही. ही बाब समोर येताच त्याच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो सापडला नाही. अखेर डेप्युटी सेल्स मॅनेजर कोशल व्यास यांनी त्याच्याविरोधात अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कौशलविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.
सराफा मार्केटमध्ये खळबळ
ग्राहकांच्या सोयीसाठी अनेक ज्वेलरी दुकानांकडून घरपोच सेवा देण्यात येते. कर्मचाऱ्यांच्या विश्वासावरच त्यांच्याकडे लाखोंचे सोने सोपविण्यात येते. मात्र कर्मचारीच विश्वासघात करत असल्याची काही प्रकरणे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. काही दिवसांअगोदर लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ज्वेलर्सच्या मालकाने राणीहार दुरुस्तीसाठी कारागिराजवळ दिला होता. मात्र तो १० लाखांचा हार घेऊन त्याने पळ काढला होता.