उमेदवारांची नावे अजूनही गुलदस्त्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:06 AM2021-07-05T04:06:36+5:302021-07-05T04:06:36+5:30
नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आघाडी करून लढायचे की स्वबळावर, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गेल्या आठवड्याभरापासून ...
नागपूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत आघाडी करून लढायचे की स्वबळावर, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीची गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेली कवायत रविवारी रात्रीपर्यंत थांबलेली नव्हती. भाजपाच्या तिकिटावर उमेदवारी अर्ज भरलेले ४ उमेदवार सोडल्यास, इतर १२ उमेदवारांची यादी त्यांनीही पाकीट बंद करून ठेवली. उमेदवारांची पळवापळवी होऊ नये व आघाडीचा फैसला रविवारी रात्रीपर्यंत सुटला नसल्याने उमेदवारी अर्ज भरायच्या अखेरच्या दिवसापर्यंत राजकीय पक्षांनी उमेदवारांची नावे गुलदस्त्यातच ठेवली.
जिल्हा परिषदेत काँग्रेस आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी जोरकस प्रयत्न करीत आहे. कारण काँग्रेसच्या सर्वाधिक सात जागा रिक्त झाल्या आहेत. सातपैकी तीन किंवा चार जरी घसरल्या तरी काँग्रेसला सत्तेत राहणे अवघड होणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कुबड्यांचा आधार काँग्रेसला घ्यावा लागत आहे. २०१९ ला झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेत अपेक्षित वाटा दिलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने ताणून धरण्याची भूमिका घेतली आहे. सूत्राच्या माहितीनुसार भाजपाकडे असलेल्या चार जागेपैकी राष्ट्रवादीने एका जागेसाठी आग्रही भूमिका घेतली आहे. तसेच निवडणुकीनंतर सत्तेतही समांतर वाटा मागितला आहे. सध्या राष्ट्रवादीला नावाचेच एक सभापतिपद आहे. पण ते पद राष्ट्रवादी आपले मानत नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काँग्रेसमध्ये चांगलेच विचारमंथन सुरू आहे. त्यासाठी काँग्रेसला राष्ट्रवादीसोबत वारंवार बैठकाही घ्यावा लागत आहे. तसे तर काँग्रेसने जि.प.च्या १६ ही जागेसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. वाटाघाटी न जमल्यास काँग्रेस सर्वच जागेवर उमेदवार देण्याच्या मानसिकतेत आहे.
- रविवारी रात्रीपर्यंत चालल्या बैठकी
काँग्रेसने आघाडीसंदर्भात प्रदेशाकडे भूमिका मांडली. प्रदेशाने आघाडीसंदर्भात सकारात्मकताही दर्शविली. त्यामुळे राष्ट्रवादीशी दिवसभर बैठकी झाल्या. विद्यमान जागेवर दोन्ही पक्ष आपापले उमेदवार लढविणार आहेत. पण भाजपाकडे असलेल्या चार जागेवर उमेदवार देण्याबाबत रात्रीसुद्धा बैठकीचे सत्र सुरूच होते. दोन्ही पक्षाचे नेते उमेदवारांच्या यादीबद्दल काहीही स्पष्ट करू शकले नाही.
- सोमवारीच माहिती पडेल उमेदवार कोण?
भाजपाने आपले चार उमेदवार निश्चित करून त्यांचे उमेदवारी अर्जही दाखल केले आहेत. तर उर्वरित १२ उमेदवार सोमवारी दिसतील, असे त्यांच्या नेत्यांनी सांगितले. सोमवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांची वेळेवरच घोषणा होईल, असे दिसत आहे.