नमो बारचा परवाना निलंबित
By admin | Published: October 21, 2015 03:06 AM2015-10-21T03:06:50+5:302015-10-21T03:06:50+5:30
गोधनी रोडवरील चंद्रिकापुरे ले-आऊटमध्ये सुरू करण्यात आलेल्या नमो बारच्या विरोधात महिला मंडळ कृती ...
महिलांच्या आंदोलनाला यश : सहा महिन्यानंतर बारचे काय ?
नागपूर : गोधनी रोडवरील चंद्रिकापुरे ले-आऊटमध्ये सुरू करण्यात आलेल्या नमो बारच्या विरोधात महिला मंडळ कृती समितीने सुरू केलेले उपोषण, बारच्या विरोधात झालेली सर्वपक्षीय आंदोलने याची दखल घेत अखेर जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी नमो बारचा परवाना १८० दिवसांकरिता निलंबित केला आहे. या संबंधीचा आदेश मंगळवारी जारी करण्यात आला. मात्र, ही सहा महिन्यांची मुदत संपल्यानंतर पुन्हा बार सुरू झाला तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक महिलांनी दिला आहे.
वर्षभरापूर्वी अनधिकृतरीत्या नमो बार सुरू करण्यात आला. स्थानिक महिलांनी याला विरोध केल्यानंतरही बार बंद करण्यात आला नाही. शेवटी महिलांनी एकत्र येत महिला मंडळ कृती समिती स्थापन केली व २ आॅक्टोबरपासून धरणे व उपोषण आंदोलन सुरू केले. भाजपचे आ. समीर मेघे, राष्ट्रवादीच्या नगरसेविका प्रगती पाटील व युवक काँग्रेसच्या लोकसभा अध्यक्ष कुंदा राऊत यांनी आंदोलक महिलांची भेट घेत आंदोलनाला संपूर्ण समर्थन दिले व बार बंद करण्यासाठी शेवटपर्यंत लढा देण्याचे आश्वासन दिले. १९ आॅक्टोबर रोजी आ. समीर मेघे यांनी कार्यकर्ते व महिलांसह बारमध्ये धडक दिली. कार्यकर्त्यांनी बारची तोडफोड केली. नगरसेविका प्रगती पाटील या देखील या आंदोलनात कृती समितीच्या महिलांसह सहभागी झाल्या. तीव्र आंदोलन करण्यात आले. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. आंदोलनादरम्यान आ. समीर मेघे यांच्यासह सुमारे ८० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. संबंधित बार बंद झाला नाही तर यापुढे अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता.
शेवटी जिल्हा प्रशासनाने बार विरोधात होत असलेल्या आंदोलनाची दखल घेतली. बारच्या विरोधात आंदोलन सुरू असून येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा अहवाल मानकापूर पोलिसांनी दिला असल्याचे नमूद करीत जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी मंगळवारी बारचा परवाना १८० दिवसांसाठी निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश जारी केला. (प्रतिनिधी)
गुलाल उधळून जल्लोष
नमो बारचा परवाना रद्द निलंबित करण्यात आल्याचे कळताच आंदोलन महिलांनी गुलाल उधळून, ढोल ताशांच्या निनादात एकच जल्लोष केला. आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल आ. समीर मेघे यांचे स्वागत करण्यात आले. नगरसेविका प्रगती पाटील यांचेही महिलांनी आभार मानले तर काँग्रेस नेत्या कुंदा राऊत यांनाही महिलांनी धन्यवाद दिले.
... तर पुन्हा तीव्र आंदोलन
जिल्हाधिकारी यांनी नमो बारचा परवाना १८० दिवसांसाठी निलंबित केला आहे. मात्र, या नंतर पुन्हा बार सुरू करण्याचा प्रयत्न झाला तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा आ. समीर मेघे, प्रगती पाटील, कुंदा राऊत यांनी दिला आहे.