नाना पटोले व समर्थकांवर कारवाई होणार? जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांची ग्वाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:56 AM2019-04-09T00:56:59+5:302019-04-09T00:57:50+5:30
सोशल मीडियावर व आमोरासामोर पत्रकारांना धमक्या देणारे, त्यांना बदनामीकारकशिवीगाळ करणारे आणि पारदर्शीपणे वार्तांकन करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सोशल मीडियावर व आमोरासामोर पत्रकारांना धमक्या देणारे, त्यांना बदनामीकारकशिवीगाळ करणारे आणि पारदर्शीपणे वार्तांकन करण्यापासून थांबविण्याचा प्रयत्न करणारे नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल व पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी सोमवारी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.
नागपूर श्रमिक पत्रकार संघ, महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ, टिळक पत्रकार भवन ट्रस्ट व नागपूर प्रेस क्लब यांच्या संयुक्त शिष्टमंडळाने या दोन्ही अधिकाऱ्यांची भेट घेऊन नाना पटोले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन सादर केले. त्यानंतर दोन्ही अधिकाऱ्यांनी पटोले व त्यांच्या समर्थकांच्या निंदास्पद कृतीची गंभीर दखल घेतली आणि प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही शिष्टमंडळाला दिली.
पटोले व समर्थकांनी आतापर्यंत पत्रकार सरिता कौशिक, रजत वशिष्ठ, रश्मी पुराणिक, राजीव खांडेकर, राजेश तिवारी, संजय डाफ, गजानन उमाटे, कृष्णा म्हस्के व राजू हाडगे यांना लक्ष्य केले. शिष्टमंडळाने या कृतीचा तीव्र शब्दात निषेध केला. पटोले व त्यांच्या समर्थकांचे पत्रकारांसोबतचे हे वागणे धक्कादायक आहे. पत्रकार नागरिकांपुढे सत्य बाजू मांडत असल्यामुळे झालेला जळफळाट यातून दिसून येतो. पत्रकार अशा भ्याड कृतीला कधीच घाबरणार नाहीत. ते आपल्या कर्तव्यांना सतत न्याय देत राहतील. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याला नुकसान पोहचविण्याचे काम पटोले समर्थक करीत आहेत. त्यांच्या या कृतीचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यांची कृती फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे असे शिष्टमंडळाने सांगितले.
महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार मैत्र आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिरीष बोरकर यांनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. शिष्टमंडळात सरिता कौशिक, राजेश तिवारी, राजेश टिकले, अभिषेक तिवारी, के. पांडे व मंगेश राऊत यांचा समावेश होता.