परमबीर सिंह बेपत्ता, तर मग अनिल देशमुखांना अटक का ? नाना पटोलेंचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2021 05:03 PM2021-11-02T17:03:26+5:302021-11-02T18:58:15+5:30
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल पटोले यांनी केला आहे.
नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १३ तासांच्या चौकशीनंतर सोमवारी मध्यरात्री ईडीने अटक केली. यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या अटकेचा निषेध व्यक्त करत भाजपवर निशाना साधला.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे बेपत्ता आहेत. आरोप करणारेच बेपत्ता असतील तर अनिल देशमुख यांना ईडीने अटक कशी काय केली, असा सवाल करीत केवळ राजकीय सूडबुद्धीने सत्तेचा दुरुपयोग करणे सुरू असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केला.
पटोले म्हणाले. केंद्र सरकारजवळ मोठमोठ्या यंत्रणा आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांनी परमबीर सिंहचा शोध घेऊन त्याला अटक करायला हवी. परमबीर सिंहचे भारतातील शेवटचे लोकेशन हे अहमदाबाद होते. ईडीनेही हीच माहिती दिली होती. अहमदाबादमधून जर परमबीर सिंह फरार झाले असतील, तर त्यामागे कुणाचा हात आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सिंह यांनी गुजरातमधूनच पलायन केले आहे आणि केंद्रीय यंत्रणांनीच त्याला मदत केली आहे, असा आरोपही त्यांनी केला.
आता देशमुखांनंतर अजित पवारांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, अशा कारवायांमुळे महाविकास आघाडी खचणार नाही. भाजपचे सुडाचे राजकारण जनतेच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच देगलूरमध्येही महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले देशमुख सोमवारी सकाळी ईडीसमोर हजर झाले. रात्री उशिरापर्यंत चौकशी केल्यानंतर देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यांच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.