"मदत तोकडी पण शेतकऱ्यांना पॅकेजमुळे दिलासा"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2021 12:53 PM2021-10-14T12:53:38+5:302021-10-14T14:38:47+5:30
शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. ही मदत तोकडी आहे हे सत्य आहे मात्र डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने राज्यांना मदत करायला पाहिजे. पण तसे न केल्याने ही अल्प मदत करावी लागली, असे नाना पटोले म्हणाले आहेत.
नगपूर : केंद्र शासनाकडून अपेक्षित मदत न मिळाल्यामुळेच राज्य सरकारने तोकडी का होईना आर्थिक मदत जाहीर केली. या पॅकेजमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी आशा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली.
राज्यातील विशेषत: विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यासंदर्भात पंचनामे आणि आढावा घेतल्यानंतर बुधवारच्या मंत्रीमंडळ बैठकीनंतर सरकारने पॅकेजची घोषणा केली. ही मदत पुरेशी नाही! मात्र या संकटकाळात शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ही मदत असल्याची भावना पटोले यांनी व्यक्त केली.
आज नागपुरात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळेस त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पॅकेजवर समाधानी आहात का, या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत ही राज्य सरकारने आपल्या आर्थिक स्थितीनुसार केली आहे. ही मदत तोकडी आहे हे सत्य आहे मात्र, डिजास्टर मॅनेजमेंटनुसार केंद्र सरकारने राज्याला भरीव निधी देऊन मदत करायला पाहिजे. पण तसे न केल्यामुळे सध्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार राज्य सरकारने ही मदत जाहीर केली आहे. यात राज्याच्या विरोधी पक्षाने लक्ष घालण्याची गरज आहे. जेव्हा राज्याची आर्थिक स्थिती सुधरेल तेव्हा राज्य सरकारला भरीव मदत करण्याच्या सूचना करणार असल्याचे पटोले यावेळी म्हणाले.
दरम्यान, परतीच्या पावसामुळे राज्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नियोजित दौरे रद्द करत अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा करून नागरिकांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला मदत देण्याची मगणी केली होती.
त्यानंतर, राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीपोटी १० हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्याचा निर्णय बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पंचनामे आणि आढावा घेतल्यानंतर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत मदतीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यानुसार सरकारने पॅकेजची घोषणा केली.