हिंदू-मुस्लीम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न : नाना पटोले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2021 04:22 PM2021-11-14T16:22:49+5:302021-11-14T18:11:28+5:30
इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र, आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
नागपूर : अमरावती हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर कडकडून टीका केली आहे. जेव्हा जेव्हा दुसऱ्या राज्यात निवडणुका येतात तेव्हा तेव्हा महाराष्ट्र राज्याला बदनाम करण्याच यांना सुचतं, असे पटोले म्हणाले.
इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. हा भाजपचा जुना प्रयत्न आहे. मात्र, आता हिंदू आणि मुस्लिम भाजपच्या या जाळ्यात येणार नाही, असेही ते म्हणाले.
भाजपची महाराष्ट्रातून पहाटेची सरकार गेली त्यामुळे ते रात्री स्वप्न न बघता दिवसा स्वप्न बघतात. त्यामुळे महाराष्ट्रात झालेला अलायन्स त्यांना हे पटू शकत नाही म्हणून ते सरकार अस्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करतात. परंतु, हिंदू-मुस्लीम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर राज्यातील जनता त्याला भीक घालणार नाही. असे म्हणत, आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलेल आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला, भुकमारी आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या, देशाचा संविधान धोक्यात आला आहे. या सगळ्या भूमिका जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
जनतेला आवाहन-
महाराष्ट्रात शांतता ठेवा. ज्या अफवा पसरवल्या जातात त्याला बळी पडू नये भाजपच्या गळाला कोणी लागू नये असे आवाहन पटोले यांनी जनतेला केले.
'सुपारी'वर स्पष्टीकरण
काँग्रेसला बदनाम करण्यासाठी आमच्याच मित्रपक्षांनी सुपारी घेतल्याचे वक्तव्यावर पटोले यांनी स्पष्टीकरण दिले असून सुपारी हा शब्द वापरला नसल्याचे म्हटले आहे. 'मी मित्रापासून सावध राहा असं म्हटलं होतं. ही भाषा आमच्या लोकांना कळली तुम्हाला नाही कळणार म्हणत विदर्भात राष्ट्रवादीला फारसे महत्व नाही, हे विदर्भातील जनतेने वारंवर सांगितले आहे', असेही पटोले म्हणाले.