विधानसभा अध्यक्ष बनणारे नाना पटोले विदर्भातील दुसरे आमदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 09:25 PM2019-11-30T21:25:37+5:302019-11-30T21:31:26+5:30
सन १९७२ नंतर रविवारी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या रुपात विदर्भाला विधानसभा अध्यक्षाचे पद मिळेल. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडीने शनिवारी १६९ मतांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आता अध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे निवडून येणे निश्चित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सन १९७२ नंतर रविवारी पुन्हा एकदा नाना पटोले यांच्या रुपात विदर्भाला विधानसभा अध्यक्षाचे पद मिळेल. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या महाविकास आघाडीने शनिवारी १६९ मतांनी विधानसभेत बहुमत सिद्ध केले. आता अध्यक्षपदाचे आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचे निवडून येणे निश्चित आहे. त्यामुळे अनेक वर्षांनंतर विदर्भाला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल.
नाना पटोले यांची मंत्रिमंडळात वर्णी लागेल, अशी चर्चा होती. काँग्रेसच्या पहिल्या दोन मंत्र्यांच्या रुपात बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांना संधी मिळाल्याने पटाले यांचेही नाव चर्चेत आले. पटोले या विधानसभेत भंडारा जिल्ह्यातील साकोली विधानसभा मतदर संघाचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. त्यांनी भाजपा सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेल्या डॉ. परिणय फुके यांचा पराभव केला आहे.
नाना पटोले यांनी शेतकरी नेते म्हणून आपली ओळखी निर्माण केली आहे. काँग्रेसचे आमदार असलेल्या पटोले यांनी २००८ मध्ये आमदार पदाचा रजीनामा देऊन लोकसभा निवडणुकीत गोंदिया-भंडारा येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफु ल्ल पटेल यांना टक्कर दिली होती. यानंतर ते भाजपमध्ये सामील होवून विधानसभेत पाहोचले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ते भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातून विजयी झाले. शेतकऱ्यांच्या मुद्यावर त्यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी पटले नाही. त्यामुळे ते भाजपा सोडून काँग्रेसमध्ये आले. यावर्षी लोकसभा निवडणुकीत त्यांनी नागपुरातून भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध त्यांनी निवडणूक लढवली. पराभूत झाल्यानंतर त्यांनी विधानसभेकडे लक्ष दिले. आपल्या साकोली विधानसभा मतदार संघातून विजय प्राप्त केला.
विधानसभा उपाध्यक्षपद अनेकदा
विधानसभा अध्यक्ष म्हणून बॅरि. शेषराव वानखेडे यांच्यानंतर नाना पटेले हे विदर्भातील दुसरे आमदार राहतील. विदर्भाच्या वाट्याला विधानसभेचे उपाध्यक्षपद मात्र अनेकदा आले आहे. प्रमोद शेंडे, वसंत पुरके, सूर्यकांत डोंगरे, मोरेश्वर टेंमुर्डे हे विधानसभ उपाध्यक्ष राहिले आहेत. विदर्भातीलच रा.सू. गवई हे विधान परिषदेचे सभापती सुद्धा राहिले आहेत.
आतापर्यंतचे अध्यक्ष
१९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ही १४ वी विधानसभा आहे. १९६० मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्याच विधानसभेचे अध्यक्ष सयाजी सिलम होते. १९६२ मध्ये त्र्यंबक भराडे अध्यक्ष बनले. १९६७ मध्ये त्यांना पुन्हा संधी मिळाली. ते अहमदनगरचे होते. १९७२ मध्ये विदर्भाचे बॅरि. शेषराव वानखेडे यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी आली. ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले. आतापर्यंतचे विदर्भातील एकमेव आमदार होते. ते नागपूरचे तीन वर्षे महापौरही राहिलेत. क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होते. यानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी शिवराज पाटील, शरद दिघे, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी, दत्ता नलावडे, अरुण गुजराथी, बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसे पाटील आणि हरिभाऊ बागडे यांनी सांभाळलेली आहे.