नाना पटोलेंचा रश्मी शुक्लांवर ५०० कोटींचा मानहानी दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2022 09:32 PM2022-03-23T21:32:31+5:302022-03-23T21:33:06+5:30
Nagpur News काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात तब्बल ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे.
नागपूर : पुणे येथील बहुचर्चित फोन टॅपिंग प्रकरण आता चांगलेच तापणार आहे. फोन टॅपिंगमुळे व्यथित झालेले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या अतिरिक्त महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरुद्ध नागपुरातील वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयात तब्बल ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. त्यात न्यायालयाने बुधवारी शुक्ला यांच्यासह इतर प्रतिवादींना नोटीस बजावून येत्या १२ एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.
फोन टॅपिंगचे बेकायदेशीर कृत्य २०१७-१८ मध्ये करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यावेळी रश्मी शुक्ला पुणेच्या पोलीस आयुक्त होत्या. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी झाली असून चौकशी समितीच्या अहवालानुसार पुणे येथील गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांनी शुक्ला व इतरांविरुद्ध २५ फेब्रुवारी २०२२ रोजी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. शुक्ला यांनी राजकीय हितसंबंधातून नाना पटोले यांच्यासह एकूण सहा लोकप्रतिनिधींचे फोन टॅप केले. त्याकरिता सहाही लोकप्रतिनिधींचे फोन नंबर वेगवेगळ्या नावांनी सेव्ह करून त्यांना अंमली पदार्थ विक्रेते दाखविण्यात आले होते. पटोले यांचा फोन अमजद खान या नावाने टॅप करण्यात आला होता. फोन टॅपिंग करताना कायदेशीर प्रक्रियेचे पालन करण्यात आले नाही. फोन टॅपिंगसाठी कट रचण्यात आला होता, असे पोलीस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या बेकायदेशीर फोन टॅपिंगमुळे वैयक्तिक व सार्वजनिक प्रतिष्ठेचे कधीही भरून निघणार नाही एवढे, नुकसान झाले आहे. त्यामुळे शुक्ला यांच्याकडून ५०० कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी पटोले यांनी न्यायालयाला केली आहे.
हे आहेत इतर प्रतिवादी
दाव्यातील इतर प्रतिवादींमध्ये केंद्रीय गृह विभागाचे सचिव, राज्याच्या गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, पुणे पोलीस आयुक्त, नागपूर पोलीस आयुक्त व फिर्यादी पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे यांचा समावेश आहे. पटोले यांच्यावतीने ॲड. सतीश उके व ॲड. वैभव जगताप यांनी कामकाज पाहिले.