स्थानिक स्वराज्य संस्थेत नाना पटोलेंचा पुन्हा ‘एकला चलो’चा नारा
By कमलेश वानखेडे | Published: May 16, 2023 06:24 PM2023-05-16T18:24:34+5:302023-05-16T18:24:58+5:30
Nagpur News राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे.
कमलेश वानखेडे
नागपूर : राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढण्याच्या नेत्यांमध्ये चर्चा सुरू असताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मात्र वेगळा सूर लावला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या ठिकाणच्या स्थानिक परिस्थितिच्या आधारावर लढण्याचा निर्णय घेऊ, काही ठिकाणी काँग्रेस एकटीही लढू शकते, असे सांगत पटोले यांनी पुन्हा ‘एकला चलो’ चा नारा दिला आहे.
पटोले म्हणाले, स्थनिक स्वराज संस्था निवडणुका घ्या, अशी आम्ही सरकारला मागणी केली. पण सरकार भीतीने घेत नाही. ५६ इंच त्यांना कळली आहे. सरकारला विधानसभेतही मागणी केली पण सरकार वेळ काढत आहे. कारण भाजपला लोकांचे त्यांच्याबद्दलचे मत कळले आहे. कर्नाटकचे लोण सर्वत्र पसरले आहे. भाजपचे पाणीपत होईल. त्यामुळे भाजप निवडणुकीपासून पळत असल्याचा आरोप त्यांनी केला. सव्वा वर्ष झालं, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक घेतल्या नाही. आता ऑक्टोबरमध्ये फार लवकर घेत आहेत, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना टोला लगावला. ओबीसीच्या आरणाच्या मुद्यावर सरकारने तातडीने बाजू मांडली नाही. सत्ता द्या ओबीसींचा निर्णय २४ तासात घेतो, असे तुम्हीच म्हणाले होते, अशी आठवणही त्यांनी फडणवीस यांना करून दिली.
लोकसभेसाठी ९ सदस्यीय समिती
- लोकसभेच्या निवडणुका एकत्रित लढण्याबाबत महाविकास आघाडीत प्राथमिक चर्चा झाली आहे. आता तीनही पक्षांचे प्रत्येकी तीन सदस्य अशी एकूण ९ लोकांची कमिटी बनणार आहे. त्यात लोकसभानिहाय चर्चा केली जाईल. १५ ते २० दिवसात याबाबतचा अहवाल येईल. त्यानंतर निर्णय घेऊ, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.