नाना पटोले यांची अवस्था ‘शोले’तील ‘जेलर’सारखी; बावनकुळे यांचा चिमटा
By योगेश पांडे | Published: November 8, 2024 08:01 PM2024-11-08T20:01:33+5:302024-11-08T20:01:54+5:30
महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावरूनच वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मात्र यात मोठा भ्रमनिरास झाला आहे.
नागपूर : महाविकासआघाडीतील नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या नावावरूनच वाद सुरू आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा मात्र यात मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यांची अवस्था सध्या असरानी यांनी केलेल्या शोले पिक्चरमधील ‘जेलर’च्या भूमिकेसारखी झाली आहे. सगळे इकडे तिकडे गेले असून त्यांच्यासोबत कुणीच उरलेले नाही. त्यांचे मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न धुळीला मिळाले आहे, असा चिमटा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काढला. शुक्रवारी नागपुरात ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महायुतीच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदावरून कुठलीही चढाओढ नाही. आम्ही विकासाकरिता काम करतो आहे. मुख्यमंत्री पदासंदर्भात केंद्रीय नेतृत्व निर्णय करेल. आमचे संपूर्ण लक्ष केवळ महायुतीला विजय मिळावा याकडेच आहे, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे हे नागपुरात येत आहेत.
मात्र ते लाडकी बहीण योजना, शेतकऱ्यांची वीजबिलमाफी चुकीची आहे असे म्हणतात. जनतेच्या हिताच्या सर्वच योजना चुकीच्या आहेत, असे त्यांना वाटते. त्यांना जनताच धडा शिकवेल, असे बावनकुळे म्हणाले.