नानक नाम जहाज है जो जपे उतरे पार...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 12:12 AM2019-11-13T00:12:16+5:302019-11-13T00:14:37+5:30
श्री गुरुनानक साहिबजी यांचा ५५० वा प्रकाशपर्व मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित राहून नामजप केला
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : श्री गुरुनानक साहिबजी यांचा ५५० वा प्रकाशपर्व मंगळवारी उत्साहात साजरा करण्यात आला. मानकापूर इनडोअर स्टेडियम येथे कथा, कीर्तन आणि गुरमत विचार संगतसह भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उपस्थित राहून नामजप केला व शीख बांधवांना प्रकाशपर्वाच्या शुभेच्छा दिल्या.
मंगळवारी सकाळी व सायंकाळच्या सत्रात कथा, कीर्तन व गुरमत विचार संगतीचे आयोजन करण्यात आली. शीख बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्टेडियमच्या मध्यभागी विराजमान श्री गुरू ग्रंथसाहिब समोर डोके टेकविले व आशीर्वाद घेतले. कीर्तनकारांनी श्री गुरुनानक देवजी यांच्या कार्याचा गुणगौरव केला तर कथाकारांनी श्री गुरुनानक यांचे उपदेश जनमानसापर्यंत पोहचविले. सोबतच श्रद्धाळुंना एकमेकांमध्ये प्रेमभाव ठेवून वागावे, मदतीसाठी पुढे यावे आणि ईश्वराचे नामस्मरण करावे, असे आवाहन केले. सकाळी ५ वाजता गुरुनानकपुर येथील श्री गुरुनानक दरबार येथून गुरू ग्रंथ साहिबजी यांची पालखी मानकापूर स्टेडियमकडे काढण्यात आली. त्यांना विराजमान करण्यात आल्यानंतर आसा दी वार कीर्तन झाले. सकाळी व सायंकाळी कथा-कीर्तन झाले. यानंतर स्टेडियममध्ये उपस्थित हजारो श्रद्धाळुंना भोजनदान (लंगर) करण्यात आले. सकाळी गुरू हरकिसन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कीर्तनातून अमृत संचार केला. सकाळच्या सत्रात सरसंघचालक भागवत आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित झाले. त्यांनी जवळपास अर्धा तास उपासनेत सहभाग घेतला व शुभेच्छा दिल्या.