‘नंदग्राम’ दहा वर्षांपासून कागदावरच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:06 AM2021-06-04T04:06:53+5:302021-06-04T04:06:53+5:30
गोठे व जनावरांच्या त्रासातून मुक्तता होईना : अर्थसंकल्पात नंदग्रामसाठी तरतूद नाही लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल ...
गोठे व जनावरांच्या त्रासातून मुक्तता होईना : अर्थसंकल्पात नंदग्रामसाठी तरतूद नाही
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असलेल्या उपराजधानीतील जनावरांच्या गोठ्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यातून त्यांची मुक्तता व्हावी, मोकाट जनावरांच्या त्रासातून सुटका व्हावी, यासाठी दहा वर्षांपूर्वी महापालिका प्रशासनाने गुजरातच्या धर्तीवर भांडेवाडीलगतच्या वाठोडा परिसरात ४४.०६ एकर परिसरात ३९.१२ कोटीचा ‘नंदग्राम’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु अजूनही हा प्रकल्प कागदावरच आहे. विशेष म्हणजे शहर विकासाचा दावा करणाऱ्या मनपा अर्थसंकल्पात यासाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.
नागपूर शहरात १०४६ गोठे आहेत. यात ४५७ अधिकृत तर ५८९ अनधिकृत आहेत. वर्दळीच्या व निवासी भागातील गोठ्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होतो. आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे.
अनेक गोपालक आपली जनावरे मोकाट सोडतात. यामुळे अपघात होतात. याचा विचार करता शहरातील जनावरांचे गोठे शहराबाहेर स्थलांतरित करण्यासाठी नंदग्राम प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली होती. सुरुवातीला गोरेवाडा परिसरातील २० हेक्टर खासगी जागेत हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र मनपाची आर्थिक परिस्थिती विचारात घेता, हा प्रकल्प राबविणे शक्य नसल्याने वाठोडा परिसरातील मनपाच्या जागेवर हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. येथे प्रत्येकी १० जनावरांसाठी ४६८ शेड उभारले जाणार आहेत. यात ४,६८० जनावरांची व्यवस्था केली जाणार आहे. सोबतचा गुरांचा दवाखाना, पाणीपुरवठा, दूध साठविण्यासाठी शीतगृह, चराईक्षेत्र, गोपालकांच्या निवासाची सुविधा अशा बाबींचा या प्रकल्पात समावेश आहे.
......
नियमाचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी
जनावरांच्या गोठ्यांना परवानगी देण्याचे अधिकार पशुसंवर्धन विभागाला आहेत. परवानगी घेतलेले ४५७ गोठे असून, विना परवानगी ५८९ गोठे आहेत. दाट वस्तीतील गोठ्यांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अशा गोपालकांकडून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे तसेच महाराष्ट्र किपिंग अँड मुव्हमेंट ऑफ कॅट इन अर्बन एरिया (नियंत्रण) अधिनियम, १९७६ चे पालन केले जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
....
अनधिकृत गोठ्यांवर नियंत्रण कुणाचे?
सर्व्हनुसार शहरात १५ हजार जनावरे आहेत. १०६५ पैकी ५८९ गोठे अनधिकृत आहेत. अनेक गोपालक आपली जनावरे मोकाट सोडतात. यामुळे परिसरातील नागरिकांना त्रास होतो, सोबतच अपघात होतात. यात अनेकांचा बळी गेला आहे. यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
....
नंदग्राम लवकरच कार्यान्वित होईल
नंदग्राम हा मनपाचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांची गुरांच्या त्रासातून मुक्तता होईल. आर्थिक मदतीसाठी हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे. हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित होणार आहे. जनावरे पाळण्याला परवानगी देण्याचे अधिकार पशुसंवर्धन विभागाला आहे. मात्र रस्त्यावर फिरणाऱ्या जनावरांना आळा घालण्याची जबाबदारी मनपाची आहे. ती पार पाडली जाते.
डॉ. गजेंद्र महल्ले,पशुचिकित्सा अधिकारी मनपा
...
असा आहे नंदग्राम आराखडा
- ४४.०६ एकर परिसरात ३९.१२ कोटींचा प्रकल्प
- एका छताखाली ४,६८० जनावरे
- मनपा ४६० शेड उभारणार
- प्रत्येक शेडमध्ये १० जनावरांची व्यवस्था
- गोरक्षकाचे निवास व चरण्यासाठी २ एकरचे मैदान
- गोपालकासाठी राहण्याची व्यवस्था
- जनावरांना चरण्यासाठी तीन मोकळी मैदाने
- जनावरांवर उपचारांसाठी पशुवैद्यकीय अधिकारी