नांदेडचे राष्ट्रध्वज फडकतात विदर्भात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 10:30 PM2019-08-13T22:30:19+5:302019-08-13T22:32:02+5:30
नागपुरात पूर्वी ध्वजनिर्मिती व्हायची. येथूनच संपूर्ण विदर्भात ध्वजांची विक्री केली जायची. पण नागपुरातील ध्वजनिर्माते कारागीर नसल्याने नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळातून ध्वजाची मागणी केली जाते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक आहे. ध्वजाच्या निर्मितीचीही संहिता आहे. त्यामुळे ध्वजसंहिता पाळूनच ध्वजाची निर्मिती केली जाते. राष्ट्रध्वजाच्या संहितेनुसार नागपुरात पूर्वी ध्वजनिर्मिती व्हायची. येथूनच संपूर्ण विदर्भात ध्वजांची विक्री केली जायची. पण नागपुरातील ध्वजनिर्माते कारागीर नसल्याने नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग मंडळातून ध्वजाची मागणी केली जाते.
गांधीसागर तलावासमोरील खादी ग्रामोद्योग भवन हे ध्वजसंहितेनुसार विक्री करणारे अधिकृत केंद्र आहे. १९६० पासून येथे ध्वजनिर्मिती केली जाते. विदर्भ, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथून ध्वजाची मागणी असते. दरवर्षी या केंद्रातून जवळपास पाच ते सात हजार ध्वजांची विक्री होते. या केंद्रावर मिळणारे ध्वज हे ध्वजसंहितेनुसार असतात. प्रत्येक ध्वजाला शासन सर्टिफाईड करून देते. संस्थेतर्फे असो अथवा शासकीय कार्यक्रमाला ध्वजसंहितेनुसार ध्वजाचा वापर करणे गरजेचे आहे. त्यामुळे विदर्भातील सर्व शासकीय कार्यालये, शाळांमध्ये या केंद्रातून ध्वजांची मागणी होते.
काय आहे ध्वजसंहिता
ध्वजारोहण सोहळ शासकीय असो की खासगी, तिथे फडकविला जाणारा ध्वज हा ध्वजसंहितेनुसारच असावा. ध्वजासाठी वापरण्यात येणारे कापड हे खादीचे असावे. ध्वजात केशरी, पांढरा, हिरवा व निळा रंगाचा वापर करण्यात येतो. ध्वजाच्या रंगात कुठलीही तफावत राहता कामा नये. संहितेनुसार ठराविक आकाराचेच ध्वज असावेत. ध्वज बनविताना एक इंच आकारसुद्धा वाढता कामा नये. या संहिता पूर्ण झाल्यानंतरच ध्वजाला ‘आयएसआय’ मार्क देण्यात येतो. ध्वजारोहण कधीही करता येत नाही. संहितेनुसार सूर्योदयानंतर ध्वजारोहण करता येते, मात्र सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरवावा लागतो. तसेच ध्वज खराब झाला असेल, तर त्याचा अवमान होऊ नये म्हणून ध्वजाला जाळून अथवा जमिनीत दफन करून नष्ट करावे लागते.
सर्टिफाईड ध्वजाची अशा आहे किमती
१८ बाय २७ इंच - ४०० रुपये
२ बाय ३ फूट - ६०० रुपये
३ बाय ४.५ फूट - ११८० रुपये
४ बाय ६ फूट - १६८० रुपये
६ बाय ९ फूट - ४३६० रुपये
८ बाय १२ फूट - ५८०० रुपये
जिल्हाधिकारी कार्यालयावर ६ बाय ९ आकाराचा ध्वज
ध्वजसंहितेनुसार १८ बाय २७ इंच आकाराच्या ध्वजापासून ८ बाय १२ फुटापर्यंतचे सर्टिफाईड ध्वज विक्रीस आहेत. १८ बाय २७ इंचाचा ध्वज २० फूट उंचीपर्यंत फडकविता येतो. संहितेनुसार हा ध्वज घरावरसुद्धा फडकवू शकतो. शाळांमध्ये अथवा खासगी ध्वजारोहण कार्यक्रमात २ बाय ३ फुटाचा ध्वज वापरला जातो. कारगीलच्या युद्धात विजयश्री मिळविल्यानंतर टायगर हिलवर जो राष्ट्रध्वज फडकला तो ८ बाय १२ साईजचा होता. ध्वजसंहितेनुसार देशाचा अभिमान वाढविणाऱ्या घटनेप्रसंगीच सर्वात मोठ्या आकाराचा ध्वज फडकविण्यात येतो. जिल्ह्याच्या मुख्यालयात म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालयात फडकविण्यात येणारा ध्वज हा ६ बाय ९ या आकाराचा असतो. इतर सरकारी कार्यालयाला कुठल्या आकाराचा ध्वज घ्यावा, याचा नियम नाही.