नंदू नाटेकर महान बॅडमिंटनपटू होते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:09 AM2021-07-29T04:09:50+5:302021-07-29T04:09:50+5:30
नीलेश देशपांडे नागपूर : नंदू नाटेकर हे देशातील महान बॅडमिंटनपटू होते. त्यांची जागा कुणीच भरून काढू शकत नाही, अशी ...
नीलेश देशपांडे
नागपूर : नंदू नाटेकर हे देशातील महान बॅडमिंटनपटू होते. त्यांची जागा कुणीच भरून काढू शकत नाही, अशी भावना चंद्रकांत देवरस यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.
नाटेकर व देवरस हे डबल्स पार्टनर होते. ते १९६० पासून सुमारे ७ वर्षे एकत्र खेळले व अनेक सामने जिंकले. दरम्यान, त्यांनी सुखदु:खाचे क्षण एकमेकांसोबत वाटले. देवरस यांनी नाटेकर यांच्याविषयी भावूक मनाने पुढे बोलताना, त्यांच्या निधनामुळे धक्का बसल्याचे सांगितले. नाटेकर यांनी १९५६ मध्ये भारताला पहिली आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा जिंकून दिली होती. त्यांनी आपल्या कारकिर्दीत १०० पेक्षा अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे विजयी चषक पटकावले. ते एक व्यक्ती म्हणूनही महान होते. त्यांचे प्रभावी राहणीमान आकर्षून घेत होते. खेळातून निवृत्ती घेतल्यानंतरही ते संपर्कात होते असे देवरस म्हणाले.
देवरस यांनी जुन्या आठवणींनाही उजाळा दिला. नाटेकर व त्यांनी १९६५ मध्ये मलेशियाच्या विश्वविजेत्या जोडीला मुंबई व पुणेमध्ये पराभूत केले होते. तसेच, त्यांनी थॉमस कप स्पर्धेत न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिकेच्या जोडीला हरवले होते असे देवरस यांनी सांगितले.
----------------
देशाचे मोठे नुकसान झाले : कुंदाताई विजयकर
नंदू नाटेकर यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाले, अशी प्रतिक्रिया नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या अध्यक्ष व माजी महापौर कुंदाताई विजयकर यांनी व्यक्त केली. त्यांनी २००८ मध्ये नाटेकर यांच्या जीवनावर पुस्तक प्रकाशित केले होते. मी एक चांगला मित्र गमावला. त्यांचा खेळ फार आवडत होता. त्यांना खेळताना जवळून पाहता यावे यासाठी लवकर कोर्टवर जात होते. ते नेहमी नागपूरला येत होते. नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाची अध्यक्ष असताना त्यांना एका कार्यक्रमासाठी निमंत्रित केले होते असेही विजयकर यांनी सांगितले.