दुचाकीवर डुलकी लागली, तरुणाचा मृत्यू: वर्धा मार्गावरील घटना

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 15, 2024 09:06 PM2024-04-15T21:06:46+5:302024-04-15T21:07:03+5:30

दुचाकीचालक मित्राविरुद्ध गुन्हा दाखल

Naps on bike, death of youth | दुचाकीवर डुलकी लागली, तरुणाचा मृत्यू: वर्धा मार्गावरील घटना

दुचाकीवर डुलकी लागली, तरुणाचा मृत्यू: वर्धा मार्गावरील घटना

नागपूर: दुचाकीवर मागे बसून असलेल्या मित्राला डुलकी लागल्यामुळे त्याला उठविण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन दोघेही डिव्हायडरला धडकून गंभीर जखमी झाले. दरम्यान मागे बसून डुलकी लागलेल्या मित्राचा मृत्यू झाला. ही घटना बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत खापरी चौकासमोर वर्धा रोडवर सोमवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली.

चेतन विनोद आग्रे (२४, रा. पाहुणे ले-आउट, पिवळी नदी, यशोधरानगर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. चेतन आपल्या मित्रांसोबत कामानिमित्त भद्रावती येथे गेला होता. तो आपला मित्र अमोल राजु झोडापे (२६) याच्या स्प्लेंडर क्रमांक एम. एच. ४९, बी. व्ही-१६७८ वर बसून नागपूरला परत येत होता. दुचाकीवर बसून असलेल्या चेतनला डुलकी लागली. त्यामुळे त्याचा मित्र अमोलने खापरी चौकासमोर, वर्धा रोडवर चेतनला झोपेतून उठविण्याचा प्रयत्न केला.

मागे बघताना अमोलचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि गाडीवरून तोल जाऊन दोघेही रोड डिव्हायडरला धडकून गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी एम्स हॉस्पीटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी चेतनला तपासून मृत घोषित केले. जखमी अमोल झोडापे याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी मृत चेतनचा भाऊ रोहन विनोद आग्रे (२२, रा. पाहुणे ले आऊट, पिवळी नदी) यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी दुचाकीचालकाविरुद्ध कलम २७९, ३३८, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.

 

Web Title: Naps on bike, death of youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.