नराधमास १० वर्षे कारावास

By Admin | Published: September 1, 2015 03:37 AM2015-09-01T03:37:53+5:302015-09-01T03:37:53+5:30

जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दोन वर्षीय बालिकेवरील बलात्कारप्रकरणी एका आरोपीला अतिरिक्त सत्र

Naradhamas imprisoned for 10 years | नराधमास १० वर्षे कारावास

नराधमास १० वर्षे कारावास

googlenewsNext

नागपूर : जलालखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका दोन वर्षीय बालिकेवरील बलात्कारप्रकरणी एका आरोपीला अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. सलमान आझमी यांच्या न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावास आणि ३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या प्रकरणात आणखी एक विधिसंघर्षग्रस्त बालक असून त्याच्याविरुद्ध बाल न्यायालयात खटला सुरू आहे.
मंगेश सुधाकर नेहारे (२२) असे या नराधमाचे नाव असून, तो उमठा या गावचा रहिवासी आहे.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, ३० जुलै २०१२ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास पीडित बालिका ही घराच्या व्हरांड्यात आपल्या सहा महिन्याच्या भावाला खेळवत होती. तिचे आई-वडील जेवण करीत होते. त्याच वेळी मंगेश नेहारे हा तेथे आला होता. तो मुलीला म्हणाला, ‘चल तुला चॉकलेट घेऊन देतो’. त्यावेळी पीडित मुलीच्या आई-वडिलाने त्याला काहीही म्हटले नव्हते. त्याने मुलीला उचलून बाहेर नेले होते.
अर्धा तास होऊनही मुलीला मंगेशने घरी परत आणले नाही म्हणून या दुर्दैवी दाम्पत्याने मोहल्ल्यात आणि बसथांब्याकडे मुलीची शोधाशोध सुरू केली होती. मुलगी कोठेही आढळत नाही म्हणून हे दाम्पत्य निराश होऊन रात्री ९ वाजताच्या सुमारास आपल्या घराकडे परतले होते. त्याच वेळी मंगेश हा मुलीला घेऊन आला होता. मुलगी चिखलाने भरली होती. कपाळावर मार लागून रक्त निघत होते. ती एकसारखी रडत होती. मुलीला कोठे नेले होते, असे या दाम्पत्याने विचारताच मंगेश हा पळून गेला होता.
मंगेश आणि विधिसंघर्षग्रस्त बालकाने चॉकलेटचे आमिष दाखवून या बालिकेला गावातील एका गोठ्यात नेले होते. दोघांनी तिच्यावर बलात्कार केला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पीडित बालिकेच्या आई-वडिलांनी जलालखेडा पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून २ आॅगस्ट २०१२ रोजी मंगेश नेहारे आणि १६ वर्षीय विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले होते.
विधिसंघर्षग्रस्त बालकाला बाल न्यायालयामार्फत सुधारगृहाकडे रवाना करण्यात आले होते. सहायक पोलीस निरीक्षक एल. डी. सोळंके यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपी मंगेश नेहारेविरुद्ध प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात तर विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध बाल न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. पीडित मुलीवर काही दिवस मेडिकल कॉलेज इस्पितळात उपचार करण्यात आले होते. न्यायालयात खटला चालून गुन्हा सिद्ध झाल्याने आरोपी मंगेश नेहारे याला भादंविच्या ३७६ (२) (एफ) कलमांतर्गत १० वर्षे सश्रम कारावास आणि २ हजार ५०० रुपये दंड, मुंबई बाल अधिनियम १९४८ च्या कलम ५७ अंतर्गत सहा महिन्यांचा सश्रम कारावास आणि ५०० रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीला या दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील.
न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक अतुल तवाडे, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण महले आणि अशोक काळे यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: Naradhamas imprisoned for 10 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.