नागपूर विमानतळावर जप्त केले ८.८१ कोटींचे अंमली पदार्थ
By मोरेश्वर मानापुरे | Published: April 4, 2024 08:09 PM2024-04-04T20:09:25+5:302024-04-04T20:09:32+5:30
- नागपूर सीमा शुल्क विभागाची कारवाई : याआधीही ८ कोटींचे १२ किलो सोने केले जप्त
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंतरराष्ट्रीय विमानतळावरनागपूर सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आणि सुमारे ८.८१ कोटी रुपयांचे २.९३७ किलो अंमली पदार्थ जप्त केले. तस्करीच्या विरोधात सुरू असलेल्या या मोहिमेमुळेच अलीकडच्या काळात नागपूर सीमा शुल्क विभागाकडून सोन्याच्या तस्करीच्या प्रयत्नाचे नऊ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, चेन्नई (तामिळनाडू) येथील रहिवासी ४५ वर्षीय पॅक्स ४ एप्रिलला पहाटे ३ वाजता युगांडाहून दोहा मार्गे कतार एअरवेजच्या क्यूआर-५९० या विमानाने नागपूर विमानतळावर आला. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ग्रीन चॅनलवरून जात असताना अडवले. त्याच्या असामान्य वर्तनावरून अधिकाऱ्यांनी त्याची कसून तपासणी केली. त्याच्या सामानात एक डमी प्रोपेलर आणि दोन प्लेट आकाराच्या डिस्कसह संशयास्पद वस्तू सापडल्या. त्यानंतर डमी प्रोपेलर व डिस्क तपासण्यासाठी उघडून पाहिली असता, प्रोपेलर व डिस्कमध्ये पांढऱ्या व पिवळ्या रंगाचे पावडर भरलेले आढळून आले. ड्रग्ज डिटेक्शन किटच्या सहाय्याने चाचणी केली असता पांढऱ्या आणि पिवळ्या पावडरमध्ये मेथाक्वॉलोन आढळून आले. पॅक्सला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा-१९८५ च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली.
सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार यांच्या निर्देशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त पीयूष भाटी यांच्या मार्गदर्शनाखाली सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. अधिकाऱ्यांच्या पथकाचे नेतृत्व सहायक आयुक्त चरणजीत सिंग आणि अंजुम तडवी यांनी केले. पथकात अधीक्षक मनीष पंढरपूरकर, प्रकाश कापसे, अंजू खोब्रागडे, राजेश खापरे, निरीक्षक आदित्य बैरवा, विशाल भोपटे, अभिजीत नारुका, प्रियंका मीना, कृष्णकांत ढाकर, हवालदार शैलेंद्र यादव यांचा समावेश होता. नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा-१९८५ अंतर्गत अधिकारी पुढील तपास करीत आहेत.
नागपूर सीमाशुल्क आयुक्त संजय कुमार म्हणाले. सीमाशुल्क अधिकारी अत्यंत दक्ष आणि सतर्क आहेत. त्यांच्या प्रयत्नांनी नागपूर सीमा शुल्क विभागाने याआधी तस्करीचे नऊ प्रयत्न रोखले आणि सुमारे ८ कोटी रुपये किमतीचे १२ किलो सोने जप्त केले. यात सहा आरोपी आहेत. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सोन्याच्या तस्करालाही अटक करण्यात आली होती.