पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदी रडत आहेत, गुलाम नबी आझाद यांची टीका, सरकारविरोधात हल्लाबोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 01:04 AM2017-12-13T01:04:50+5:302017-12-13T01:05:05+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातमध्ये पराभव दिसू लागल्यामुळेच काँग्रेसने पाकिस्तानसोबत सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप करून ते रडू लागले आहेत, अशी टीका राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी केली.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी राज्य सरकारविरुद्ध नागपूर विधिमंडळावर काढलेल्या जनआक्रोश व हल्लाबोल मोर्चात आझाद बोलत होते.
ते म्हणाले, मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या कथित बैठकीत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी सैन्यप्रमुख, राजदूत, विदेश सचिव आदींनी पाकिस्तानसोबत हातमिळवणी करून सरकारविरुद्ध कट रचल्याचा आरोप मोदींनी केला आहे. अशा पंतप्रधानांवर मला शरम वाटते. गुजरातेत पराभव दिसू लागताच त्यांची एवढी पातळी खालावली? बिहारच्या निवडणुकीतही पराभव दिसू लागला असताना ‘नितीश जितेगा, तो पाकिस्तान मे जश्न मनेगा’ असे मोदी म्हणाले होते. आता तेच नितीशकुमार मोदींच्या मांडीवर जाऊन बसले तेव्हा पाकिस्तानात जल्लोष झाला का, असा सवालही त्यांनी केला.
पंतप्रधान मोदी हे एकतर कोणत्या ना कोणत्या राज्यात निवडणुकीत व्यस्त असतात, नाहीतर विदेशात असतात. आम्ही त्यांना कधी जपान, जर्मनी, अमेरिकेत शोधायचे, तर कधी आसाम, बिहार, उत्तर प्रदेशात शोधायचे. ते पंतप्रधान म्हणून देशासाठी कधी काम करतात, असा सवाल त्यांनी केला. पंतप्रधानांसह भाजपाचे मुख्यमंत्री, मंत्री हे दोन-दोन महिने निवडणुका असलेल्या राज्यात डेरा टाकतात. भाजपाचे सरकार हे आता निवडणुका लढविण्याची मशिन झाली आहे, अशी टीका त्यांनी केली.
जो भाजपाला साथ देत नाही त्याला देशद्रोही ठरविले जात आहे. जो भाजपाच्या धोरणांचा विरोध करतो त्याला दहशतवादी ठरविले जात आहे, असे सांगत भाजपाच्या या भूमिकेपासून सतर्क राहा, असा सावधगिरीचा इशाराही त्यांनी दिला.
सामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली - दर्डा
शेतकरी आणि शेतमजुरांचे प्रश्न घेऊन ‘लोकमत’च्या माध्यमातून आम्ही लढत आहोत. संपूर्ण राज्य आणि देश शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाने अस्वस्थ असताना काँग्रेसने राज्यात प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून या प्रश्नांना वाचा फोडली आहे. शेतकºयांची सर्वच स्तरांवर कुचंबना होत आहे. त्याचा कुणी वाली नाही. राहुलजी आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली या देशातील गरीब, दलित, शोषित, वंचितांचे प्रश्न सुटायला मदत होईल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार विजय दर्डा यांनी जनआक्रोश-हल्लाबोल रॅलीचा शुभारंभ करताना व्यक्त केला.
दोन्ही काँग्रेस एक होऊ शकतात : काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष असले तरी त्यांची विचारसरणी एकच आहे. त्यामुळे पुन्हा दोन्ही पक्ष एकच होतील, अशी भविष्यवाणी आझाद यांनी या वेळी केली.