देशाचे पायलट म्हणून नरेंद्र मोदी अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 09:08 PM2018-03-23T21:08:21+5:302018-03-23T21:08:32+5:30
विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे देशाच्या १२५ कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या पायलटची देशाला आवश्यकता आहे. देशाचा पायलट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शुक्रवारी नागपुरात केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विमानातील प्रवाशांना योग्य ठिकाणी पोहोचविण्यासाठी कुशल पायलटची आवश्यकता असते. त्याचप्रमाणे देशाच्या १२५ कोटी लोकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी चांगल्या पायलटची देशाला आवश्यकता आहे. देशाचा पायलट म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी सपशेल अपयशी ठरल्याची टीका पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी शुक्रवारी नागपुरात केली.
अकोला येथे एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी ते नागपुरात आले होते. नागपुरात आल्यानंतर प्रथम त्यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थींचे दर्शन घेतले. यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, गेल्या चार वर्षात मोदी सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. नरेंद्र मोदींबद्दल लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. शेतकऱ्यांना दामदुप्पट भाव देऊ, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, असे आश्वासन दिल्यानंतरही शेतकºयांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे, विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यामुळे जनता विचारत आहे. अच्छे दिन कुठे आहेत? विमानात जाताना आपण चांगला पायलट असावा, अशी अपेक्षा करतो. प्रवाशांचे जीवन पायलटच्या हातात असते. त्याचप्रमाणे देशातील सव्वाशे कोटी लोकांचे भवितव्य पंतप्रधानांच्या हातात असते. परंतु देशाचा पायलट संपूर्णपणे अपयशी ठरला असून आता त्यांच्या हातात देश ठेवणे धोक्याचे ठरणार असल्याचा इशारा पटेल यांनी दिला.
पंतप्रधानांना होती पीएनबी घोटाळ्याची माहिती
हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी केलेला पीएनबी घोटाळ्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना होती, असा आरोप करीत पीएनबी घोटाळ्याबद्दल आपला नाईलाज असल्याचे वक्तव्य मोदींनी केले आहे. यावरून त्यांना या घोटाळ्याची पूर्वकल्पना होती, हे स्पष्ट होते. या घोटाळ्याची पूर्वकल्पना असताना चुप्पी साधणे हा देशद्रोह ठरत नाही काय, असा सवाल त्यांनी केला.