नरखेडमध्ये देशमुख विरुद्ध टीम भाजपा, उमरेडमध्ये पारवे विरुद्ध पारवे लढत रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:06 AM2020-12-23T04:06:50+5:302020-12-23T04:06:50+5:30
जितेंद्र ढवळे नागपूर : पदवीधर मतदार संघातील दमदार यशानंतर महाविकास आघाडीने नागपूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या १३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे लक्ष ...
जितेंद्र ढवळे
नागपूर : पदवीधर मतदार संघातील दमदार यशानंतर महाविकास आघाडीने नागपूर जिल्ह्यात होऊ घातलेल्या १३० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीकडे लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे ग्रा.पं. निवडणुकीतही महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना होणार आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल मतदार संघातील २० ग्रा.पं.मध्ये निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात काटोल तालुक्यातील ३ तर नरखेड तालुक्यातील १७ ग्रा.पं.चा समावेश आहे. त्यामुळे येथे राष्ट्रवादी आणि भाजपा पुन्हा एकदा आमोरासमोर येणार आहे. पदवीधर मतदार संघाची निवडणूक येथे जि.प. सदस्य सलील देशमुख यांनी डोक्यावर घेतली होती, हे विशेष. काटोल न.प.मध्ये सध्या मोठी राजकीय उठापटक सुरू आहे. भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना घेरण्यासाठी अनिल देशमुख यांनी सर्वत्र नाकाबंदी केली आहे. मग ते गुंठेवारी प्रकरण असो की घरकुल बांधकाम! ठाकूर सर्वत्र चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. ग्रामविकासाचे व्हिजन असलेल्या ठाकूर व देशमुख यांना ताकद दाखविण्यासाठी ग्रा.पं. निवडणुकीच्या निमित्ताने संधी चालून आली आहे. ती हे किती कॅश करतात, हे निकालानंतरच कळेल. भाजपकडून किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष संदीप सरोदे हे शेतकऱ्यांना जवळ करीत महाविकास आघाडी सरकारला सातत्याने घेरत असतात. काटोल तालुक्यातील भोरगड आणि खंडाळ (खु.) या ग्रा.पं. पारडसिंगा जि.प. सर्कलमध्ये मोडतात. येथे राष्ट्रवादीचे चंद्रशेखर चिखले यांनी भाजपचे संदीप सरोदे यांचा पराभव केला होता.
उमरेड मतदार संघातील ४२ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. यात १४ ग्रा.पं. उमरेड तालुक्यातील तर २५ ग्रा.पं. कुही आणि ३ ग्रा.पं. भिवापूर तालुक्यातील आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजू पारवे यांनी राज्य पंचायत राज कमिटीचे अध्यक्ष सुधीर पारवे यांचा पराभव करीत भाजपला धक्का दिला होता. पारवे यांनी विजयाचा हा ग्राफ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही कायम ठेवला. मात्र कुही तालुक्यात जि.प.मध्ये काँग्रेसला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे या मतदार संघातील ग्रा.पं. निवडणुकीतही पारवे विरुद पारवे असा सामना रंगणार आहे. उमरेड मतदार संघात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांचाही प्रभाव आहे. त्यामुळे तेही निवडणुकीच्या मैदानात राहतील. भाजपकडून आनंदराव राऊत, कुही तालुकाध्यक्ष सुनील जुवार हेही किल्ला लढवीत आहेत.
पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या सावनेर मतदार संघात १७ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. यात सावनेर तालुक्यातील १२ तर कळमेश्वर तालुक्यातील ५ ग्रा.पं.चा समावेश आहे. जि.प. आणि पं.स. निवडणुकीत येथे काँग्रेसने भाजपचे पानिपत केले होते. याही वेळी येथे काँग्रेस विरुद्ध भाजपा असाच सामना होणार आहे. भाजपकडून येथे डाॅ. राजीव पोतदार काँग्रेसचे ऑपरेशन करण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
शिवसेनेचा गड असलेल्या रामटेक मतदार संघातील रामटेक तालुक्यात ९ तर पारशिवनी तालुक्यातील १० ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. जि.प. निवडणुकीत येथे सेनेला फार चमत्कार दाखविता आला नाही. या दोन्ही तालुक्यात काँग्रेस विरुद्ध आ. आशिष जयस्वाल समर्थक आणि माजी आमदार डी. एम. रेड्डी समर्थक यांच्यात सामना होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपचे रेड्डी वर्षभर सक्रिय दिसले नाही. मात्र परवा वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम घेत त्यांनी सक्रिय असल्याचा संकेत स्थानिक राजकीय विरोधकांना दिला. येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, डाॅ. अमोल देशमुख, चंद्रपाल चौकसे, उदयसिंग यादव त्यांच्या समर्थकांसाठी मैदानात उतरतील.
भाजपचा गड असलेल्या कामठी मतदार संघातील कामठी तालुक्यातील नऊ तर मौदा तालुक्यातील सात ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. या मतदार संघात भाजपचे प्रदेश महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांचे होमटाऊन असलेल्या कोराडी ग्रा.पं.ची निवडणूक होत आहे. ही ग्रा.पं. १५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. जि.प. निवडणुकीत कोराडी सर्कलमध्ये काँग्रेसचे नाना कंभाले यांनी मॅजिक करीत भाजपचा पराभव केला होता. पंचायत समितीत कोराडी गणाची जागा भाजपने राखली होती. त्यामुळे कोराडीच्या निमित्ताने बावनकुळे यांना पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा ग्रा.पं.च्या मैदानात उतरावे लागणार आहे. येथे कंभाले त्यांच्या काँग्रेसमधील विरोधकांना ताकद दाखविण्यासाठी काय जादू करतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
गुमथळा-महालगाव जि.प. सर्कलचे सदस्य व जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते अनिल निधान यांचे मूळ गाव आसोली महालगाव ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. येथे त्यांना काँग्रेसचे आव्हान आहे. पदवीधर मतदार संघाच्या मतदानाच्या दिवशी काँग्रेसचे सुरेश भोयर आणि राजेंद्र मुळक यांनी कामठीतील बूथवर बसून कार्यकर्त्यांना एकसंघ होण्याचा मॅसेज दिला होता, हे विशेष. त्यामुळे कोराडीसह कामठी आणि मौदा तालुक्यातील ग्रा.पं. निवडणुकीत काँग्रेसची एकसंघता किती कायम राहील, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. या मतदार संघात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर, काँग्रेसच्या अवंतिका लेकुरवाळे आणि भाजपचे मोहन माकडे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यासोबतच भाजपच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच ग्रा.पं. निवडणुकीच्या परीक्षेला जाणारे अरविंद गजभिये जिल्ह्यात भाजपला किती यश मिळवून देतात, हेही भाजप नेतृत्वाकडून तपासले जाणार आहे.
नागपूर (ग्रा.), हिंगण्यात महाविकास आघाडीची परीक्षा
हिंगणा आणि कामठी विधानसभा मोडणाऱ्या नागपूर ग्रामीण तालुक्यात ११ ग्रा.पं.मध्ये निवडणूक होत आहे. नवीन वर्षात होणाऱ्या वाडी नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने ही निवडणूक महाविकास आघाडीची ताकद तपासणारी आहे. गतवेळी येथील बहुतांश ग्रामपंचायतींवर भाजपने ताबा मिळविला होता. यावेळी महाविकास आघाडीची ताकद येथे भाजपला रोखण्यात किती यशस्वी होते, हे दवलामेटी, द्रुगधामना ग्रा.पं.च्या निकालानंतरच समजेल. येथे महाविकास आघाडीकडून खा. कृपाल तुमाने, माजी मंत्री रमेश बंग, काँग्रेस नेते नाना गावंडे, राष्ट्रवादीचे विजय घोडमारे, कुंदा राऊत यांच्यासह नेत्यांची मोठी फौज आहे. भाजपकडून आ. समीर मेघे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
हिंगणा तालुक्यात होऊ घातलेल्या पाच ग्रा.पं.मध्येही भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी (राष्ट्रवादी) असा सामना होईल. येथे काँग्रेसचे बाबा आष्टनकर, राष्ट्रवादीचे महेश बंग यांनी कंबर कसली आहे.
सहा तालुक्यात लक्षवेधी
नागपूर जिल्ह्यात १३० ग्रा.पं.साठी निवडणूक होत असली तरी नागपूर ग्रामीण, उमरेड, कुही, कोराडी (कामठी),नरखेड आणि सावनेर तालुक्यातील निवडणुका अधिक रंगतदार होतील. येथील निकालानंतर जिल्ह्यात महाविकास आघाडीची एकसंघता स्पष्ट होईल.
आमने-सामने
अ - राजू पारवे विरुद्ध सुधीर पारवे
ब - अनिल देशमुख विरुद्ध चरणसिंग
ठाकूर आणि संदीप सरोदे
क - सुनील केदार विरुद्ध राजीव पोतदार
ड - चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध सुरेश भोयर, नाना कंभाले
ई : समीर मेघे विरुद्ध रमेश बंग