नागपुरातील हज हाऊसच्या चोहीकडील रस्ते अरुंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:57 PM2019-07-15T12:57:46+5:302019-07-15T12:59:03+5:30
महापालिका प्रशासनाने हज यात्रेदरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु आतापर्यंत महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने हज हाऊसचे अतिक्रमण हटविलेले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापालिका प्रशासनाने हज यात्रेदरम्यान पुरेशा सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा केला आहे. परंतु आतापर्यंत महापालिकेच्या प्रवर्तन विभागाने हज हाऊसचे अतिक्रमण हटविलेले नाही. दोन दिवसात नागपूरसह विदर्भ, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून हज यात्रेकरू पोहोचणार आहेत. अतिक्रमणामुळे वाहतुकीच्या समस्येचा त्रास होऊ शकतो. सुविधांच्या बाबतीत मोठे दावे करून महापालिका उदासीन धोरण दाखवीत आहे. ‘लोकमत’ने हज हाऊसच्या परिसरातील मार्गाची पाहणी केली असता धक्कादायक चित्र दृष्टीस पडले. अतिक्रमणामुळे केवळ हज हाऊसच्या बाजूचे रस्तेच अरुंद झाले नाहीत, तर हज हाऊसच्या सुंदरतेवरही परिणाम झाला आहे.
नागपूर इंबार्केशनवरून १८ जुलैला हज यात्रा सुरू होत आहे. या वेळी नागपूर इंबार्केशनवरून तीन हजार हज यात्री प्रवासासाठी रवाना होणार आहेत. यात नागपूर, विदर्भ, छत्तीसगड, मध्यप्रदेशच्या हज यात्रेकरूंचा समावेश आहे. यादरम्यान मुस्लीम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने हज हाऊसमध्ये येतात. सकाळपासून रात्रीपर्यंत नागरिकांची वर्दळ राहते. हे लक्षात घेऊन ९ जुलैला विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी एक बैठक आयोजित केली होती. बैठकीत सर्व व्यवस्था चांगल्या पद्धतीने करण्याच्या सूचना त्यांनी संंबंधित विभागांना दिल्या होत्या. विभागीय आयुक्तांनी हज हाऊसजवळील अतिक्रमण हटविण्यासाठी निर्देश दिले होते. याशिवाय महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजीज शेख यांनी हज हाऊसमध्ये समीक्षा बैठक घेऊन चांगली व्यवस्था करण्याचा दावा केला होता, तरीसुद्धा महापालिकेने अतिक्रमण हटविले नाही.
नियमित कारवाईची गरज
हज हाऊसच्या चारही बाजूंनी अतिक्रमण झाले आहे. महापालिका प्रशासनाला येथे नियमित कारवाई करण्याची गरज आहे. परंतु हज यात्रेदरम्यानही कारवाई न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. हज हाऊसच्या प्रवेशद्वाराकडून सीए रोडकडे जाणाऱ्या मुख्य मार्गावर अतिक्रमण झाले आहे. याच मार्गाने यात्रेकरूंची वाहने आत येतात. अशास्थितीत येथे वाहतूक विस्कळीत होते. हज हाऊसकडून बजेरियाकडे जाणारा रस्ता अरुंद झाला आहे. हज हाऊसच्या भिंतीला लागून गॅरेज, भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी आलेली वाहने रस्त्यावर उभी राहतात. हज हाऊसच्या एका टोकावर जुना जेलखाना रोडही अतिक्रमणामुळे अरुंद झाला आहे. येथे स्थानिक दुकानदार, खासगी कार्यालयाची वाहने, हातठेले आदींचे अतिक्रमण आहे. हज हाऊसच्या मागील भागात यात्रेकरूंची वाहने उभी राहतात, परंतु तेथेही अतिक्रमण आहे.
हज हाऊसच्या सुंदरतेला ग्रहण
हज हाऊसची सुंदर इमारत पाहताच आकर्षित करते. परंतु चारही बाजूंनी पसरलेल्या अतिक्रमणामुळे हज हाऊसच्या सुंदरतेला ग्रहण लागले आहे. अतिक्रमणामुळे हज हाऊसची सुंदरता कमी होण्यामागे प्रशासनाचा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. अतिक्रमणामुळे हज हाऊसची भिंतही खराब झाली आहे. अनेक ठिकाणी भिंतीला लागून पक्के शेड तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे भिंतीवरील नक्षीकाम खराब झाले आहे.
‘हज हाऊस जवळील अतिक्रमणामुळे यात्रेदरम्यान त्रास होऊ शकतो. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या बैठकीत जिल्हा हज समितीने अतिक्रमण हटविण्याची मागणी केली होती. विभागीय आयुक्तांनी बैठकीतच महापालिका प्रशासनाच्या संबंधित विभागास अतिक्रमण हटविण्याचे निर्देश दिले होते. यात्रा सुरू होण्यापूर्वी अतिक्रमण हटविणे आवश्यक आहे.’
- जुनेद खान, अध्यक्ष
नागपूर जिल्हा हज समिती