Nashik Bus Accident : मृत चालकाला दोषी ठरवून मालकासह आरटीओला अभय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2022 01:23 PM2022-10-11T13:23:48+5:302022-10-11T13:29:27+5:30

ट्रॅव्हल्स अपघाताच्या प्राथमिक चौकशीतील निष्कर्ष; विधिज्ञ म्हणतात, अपघात नव्हे संगनमताने केलेले कृत्य

Nashik Bus Accident : RTO along with the owner are sets to free by convicting the dead bus driver | Nashik Bus Accident : मृत चालकाला दोषी ठरवून मालकासह आरटीओला अभय

Nashik Bus Accident : मृत चालकाला दोषी ठरवून मालकासह आरटीओला अभय

googlenewsNext

नागपूर : यवतमाळहून मुंबईला जाणाऱ्या चिंतामणी ट्रॅव्हल्सचा नाशिक येथे अपघात झाला. यात १२ जणांचा जळून कोळसा झाला, तर ४३ जण गंभीर जखमी झाले. या घटनेनंतर थेट पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले. या घटनेचा प्राथमिक चौकशी अहवाल आला असून, त्यात मृत बस चालकाला दोषी ठरविण्यात आले आहे. तर मालक आणि आरटीओ विभागाला अभय देण्यात आले आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून चौकशीची गरज असल्याचे विधिज्ञांचे म्हणणे आहे.

नाशिक येथील अपघाताच्या घटनेनंतर बसच्या सुरक्षा साधनांची तपासणी करणारी आरटीओची यंत्रणाही याकडे दुर्लक्ष करीत होती, हे उघड झाले. अपघाताच्या घटनेनंतर नाशिक येथील पंचवटी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक प्रवीण शहाजी देवरे यांनी एमएच २९ एडब्ल्यू ३१ या खासगी बसचा चालक ब्रह्मदत्त सोगाजी मनवर (अपघातात मृत) याच्यावर पूर्ण ठपका ठेवला. वाहन बेदरकारपणे चालविले, प्रवाशांच्या मरणास कारणीभूत, गंभीर दुखापतीस कारणीभूत असल्याने त्याच्यावर भादंवि ३०४ अ, २७९, ३३६, ३३७, ३३८, ४२७ तसेच मोटरवाहन कायदा कलम १८४, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

- बसमधील त्रुटींची चौकशी आवश्यक

खासगी बसमधील सुरक्षा तपासणी ही आरटीओची जबाबदारी आहे. अपघात झालेल्या बसमध्ये नेमक्या काय त्रुटी होत्या, याची चौकशी होणे गरजेची आहे. क्षमतेपेक्षा अतिरिक्त प्रवासी यवतमाळहून नाशिकपर्यंत घेऊन जात असतानाही बसला कुठेही थांबविण्यात आले नाही. बसमध्ये ‘स्पीड गव्हर्नर’ बसविले होते का, आग विझविणारी यंत्रणा होती काय, याचीही खातरजमा झाली नाही. विशेष म्हणजे, बस चालक जिवंत नाही. त्याच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. यामुळे ठोस अशी कारवाई होणार नसल्याचे दिसून येत आहे.

सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला हवा

या अपघातात चालकासोबत खासगी बसचे संचालक आणि आरटीओ अधिकारी यांची अक्षम्य चूक आहे. हा केवळ निष्काळजीपणाने झालेल्या अपघातातील मृत्यू नसून सदोष मनुष्यवधाअंतर्गत मोडणारा गुन्हा आहे. यात आरटीओचे जबाबदार अधिकारी, वाहतूक पोलीस शाखेतील अधिकारी, खासगी बस संचालक यांनी संगमनताने घडवून आणलेले कृत्य आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल व्हायला हवा.

- अॅड. जयसिंह चव्हाण

- वर्धेत संस्था चालकाला बस अपघातात शिक्षा

वर्धा येथे एका संस्थेच्या बसचा अपघात झाला. त्यात चालकासोबत संस्था चालकावरही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद होता. याच धर्तीवर खासगी बस अपघातात कारवाई होणे आवश्यक आहे.

- ॲड. इम्रान देशमुख

- आरटीओ तपासणी नसल्याने सुरक्षेला धोका

निकषाप्रमाणे खासगी बसेसची तपासणी होत नाही. रात्रकालिन बसेस ताशी १०० पेक्षा अधिक वेगाने धावतात. प्रवासी सुरक्षेकडे दुर्लक्ष होते. हाच प्रकार १२ जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने संबंधित यंत्रणेसह संचालकावरही गुन्हा नोंद होणे आवश्यक आहे.

- ॲड. अमित बदनोरे, अध्यक्ष, जिल्हा वकील संघ, यवतमाळ.

- बस तपासणीची यंत्रणाच बदलणे गरजेचे

वारंवार होणाऱ्या खासगी बसच्या अपघाताला गंभीरतेने घ्यायला हवे. बस तपासणीची यंत्रणाच बदलणे गरजेचे आहे. जो पर्यंत एखाद्या अपघातात अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जात नाही तोपर्यंत यंत्रणा सुधरणार नाही.

- राजू वाघ, सदस्य राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषद, परिवहन मंत्रालय

- निष्काळजीपणा झाला म्हणूनच अपघात

बसमधील आपत्कालिन स्थितीत सुखरूप बाहेर पडणे सहज शक्य आहे. या अपघातात निष्काळजीपणा झाला म्हणूनच मृत्यूची संख्या वाढली. दोषींवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे.

- रवींद्र कासखेडीकर, सचिव जनआक्रोश, नागपूर

Web Title: Nashik Bus Accident : RTO along with the owner are sets to free by convicting the dead bus driver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.