नासुप्रचा मेट्रोरिजन विकास आराखडा फसवा
By admin | Published: October 2, 2015 07:40 AM2015-10-02T07:40:57+5:302015-10-02T07:40:57+5:30
नागपूर सुधार प्रन्यासने तयार केलेल्या मेट्रोरिजन विकास आराखड्यावर येत्या ३ आॅक्टोबरला नासुप्रच्या अंबाझरी
नागपूर : नागपूर सुधार प्रन्यासने तयार केलेल्या मेट्रोरिजन विकास आराखड्यावर येत्या ३ आॅक्टोबरला नासुप्रच्या अंबाझरी रोडवरील कार्यालयात सकाळी ११ वाजतापासून जनसुनावणी आयोजित केली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी या जनसुनावणीत सहभागी होऊन मेट्रोरिजन आराखड्याला विरोध करण्याचे आवाहन जय जवान जय किसान संघटनेचे प्रशांत पवार यांनी केले आहे.
नासुप्रच्या मेट्रोरिजनमध्ये जिल्ह्यातील ७२० गावांचा समावेश आहे. याअंतर्गत नासुप्रने मेट्रारिजनचा विकास आराखडा तयार केला आहे. मात्र या आराखड्यात विकास प्रकल्पाबाबत भेदभाव करण्यात आल्याचा आरोप पवार यांनी केला. वर्धा रोडसारख्या काही ठराविक क्षेत्रात विकासाचे प्रकल्प राबवून इतर क्षेत्रावर अन्याय केला गेल्याचे ते म्हणाले. हा आराखडा लागू झाल्यास ७२० गावातील २ लाख घरे आणि १० लाख भूखंड अनियमित होणार असून, हे भूखंड नियमित करण्याबाबत कोणतीही भूमिका नासुप्रने घेतली नाही, त्यामुळे कोणत्याही क्षणी बुलडोझर चालविण्यास नासुप्र मोकळी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या जमिनी ग्रीन झोनमध्ये टाकल्याने आरक्षित झालेली जागा शेतकऱ्यांना विकता येणार नाही व या जागेचा मोबदला मिळणार नाही. मेट्रोरिजनमध्ये आलेल्या बहुतेक गावातील नागरिकांना विकास आराखड्याबाबत माहितीच नसल्याचे प्रशांत पवार यांनी सांगितले. विकास आराखड्याच्या नावाखाली नासुप्र लोकांच्या डोळ्यात धूळ झोकत असल्याचा आरोप त्यांनी लावला. नासुप्रच्या जनसुनावणीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मेट्रोरिजन विकास आराखड्याला विरोध करण्याचे आवाहन पवार यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केला. पत्रपरिषदेला विजयकुमार शिंदे, अरुण वनकर, सुभाष बांते, रविशंकर मांडवकर, किशोर चोपडे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)