नासुप्रच्या विश्वस्तपदी शिंगणे?
By admin | Published: September 22, 2015 04:07 AM2015-09-22T04:07:48+5:302015-09-22T04:07:48+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व जीवलग मित्रांपैकी एक असलेले नगरसेवक भूषण शिंगणे यांची नासुप्रच्या
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू व जीवलग मित्रांपैकी एक असलेले नगरसेवक भूषण शिंगणे यांची नासुप्रच्या विश्वस्तपदी वर्णी लागेल, हे जवळपास निश्चित झाले आहे. पक्षातर्फे अधिकृतपणे शिंगणे यांचे नाव जाहीर करण्यात आलेले नाही. २२ सप्टेंबर रोजी पक्षाच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत नावावर शिक्कामोर्तब होईल व २३ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत शिंगणे यांच्या नावाची महापौर प्रवीण दटके घोषणा करतील.
डॉ. छोटू भोयर यांनी काही दिवसांपूर्वी नासुप्र विश्वस्तपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासूनच या पदासाठी इच्छुकांनी लॉबिंग सुरू केले होते.
शिंगणे यांच्यासह नगरसेवक बंडू राऊत, सुनील अग्रवाल, गिरीश देशमुख, नीता ठाकरे, चेतना टांक यांचेही नाव स्पर्धेत होते. प्रत्येकाचा दावा तगडा मानला जात होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपुरात होते. यावेळी दोन्ही नेत्यांची आपसात चर्चा होऊन शिंगणे यांचे नाव निश्चित करण्यात आले.
स्थायी समिती अध्यक्षही निश्चित
भाजपमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नासुप्र विश्वस्तपदी शिंगणे यांचे नाव निश्चित करताना स्थायी समितीच्या पुढील अध्यक्षाचे नावही निश्चित करण्यात आले आहे. मात्र, सध्याच संबंधित नावाचा खुलासा करायचा नाही, असेही पक्षांतर्गत ठरले आहे.
आज होणार निर्णय
विश्वस्तपदासाठी अद्याप कुणाचेही नाव निश्चित करण्यात आलेले नाही. भाजपच्या शहर संसदीय मंडळाची मंगळवारी रात्री बैठक आयोजित करण्यात आली आहे. तीत दोन्ही ज्येष्ठ नेत्यांचे मत विचारात घेऊन चर्चा केली जाईल व निर्णय घेतला जाईल.
आ. कृष्णा खोपडे, शहर अध्यक्ष, भाजप